नगर : सुजय विखे पाटील यांच्या भाजपा प्रवेशानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील देखील भाजपात जाणार असल्याची चर्चा जोर धरू लागली. आज पंतप्रधान मोदी यांच्या नगरमध्ये होणाऱ्या सभेत राधाकृष्ण विखे भाजपात प्रवेश करतील असे म्हटले जात होते. पण यासंदर्भात त्यांचे पुत्र आणि भाजपाचे उमेदवार सुजय विखे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विखे भाजपात प्रवेश करणार नाहीत असे सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. ते पंतप्रधान मोदींच्या सभेला देखील उपस्थित राहणार नाहीत असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखे यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेला आता पूर्ण विराम मिळाला आहे.
आज नगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा निरंकारी भवनामागील सावेडी मैदानात होणार आहे. डॉ. सुजय विखे पाटील हे नगर मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार आहेत. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाने प्रतिष्ठेची केली आहे. या सभेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील प्रमुख मंत्री आणि जिल्ह्यातील नेते उपस्थित राहणार आहेत.
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशावर बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'विखे पाटील आमचे जेष्ठ नेते आहेत, ते विश्वासार्हता जपतील असा विश्वास आहे', अशी उपरोधिक टीका बाळासाहेब थोरातांनी विखे-पाटलांवर केली. विखे जिथे जातील तिथे काँग्रेसचंच काम करतील. भाजपाच्या बैठकीला गेले तर ते काँग्रेसच्या उमेदवाराचेच काम करतील, असंही विखे पाटील यांनी म्हटले होते.