भाजपाला महाराष्ट्र-यूपीत कमी जागा, मी दुसऱ्यांदा मंत्री होणार - आठवले

 मंत्रिमंडळात दुसऱ्यांदा मंत्रीपदी वर्णी लागेल असा आत्मविश्वासही आठवले यांनी व्यक्त केला

Updated: May 12, 2019, 07:50 AM IST
भाजपाला महाराष्ट्र-यूपीत कमी जागा, मी दुसऱ्यांदा मंत्री होणार - आठवले  title=

लातूर : लोकसभेच्या ०७ टप्प्यातील मतदानानंतर भाजप आणि एनडीएला महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात फटका बसेल अशी शक्यता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. लातूरमध्ये दुष्काळ दौऱ्यावर असताना ते झी २४ तासशी बोलत होते. केंद्र सरकारने महाराष्ट्राला दुष्काळ मदत जाहीर केल्यानंतर केंद्रातील मंत्री हे दुष्काळग्रस्त भागातील दौऱ्यावर आहेत. केंद्रीय सामाजिक-न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे ही दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. लातूर जिल्ह्याच्या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा आठवले यांनी केला. अहमदपूर तालुक्यातील धसवाडी येथील जैन समाजाच्या दिव्यज्योत चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या जिल्ह्यातील एकमेव चारा छावणीला त्यांनी भेट दिली.

२३ मे च्या निकालात भाजपला २६० ते २७० जागा मिळतील तर एनडीए ला ३०० ते ३२५ जागा मिळण्याची शक्यताही रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे केंद्रात पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार असून आपलीही आगामी मोदी मंत्रिमंडळात दुसऱ्यांदा मंत्रीपदी वर्णी लागेल असा आत्मविश्वासही आठवले यांनी व्यक्त केला आहे. पश्चिम बंगाल, ओरिसा, दक्षिण भारतात भाजपला चांगलं यश मिळेल असा दावाही आठवले करीत आहेत. लातूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील दौऱ्याची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.