'आघाडीने निवडणुकीसाठी भाड्याची बुजगावणी उभी केली'

लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोर धरू लागला आहे. प्रत्येक पक्षाकडून आपल्या उमेदवाराचा जोरदार प्रचार केला जात आहे.

Updated: Apr 8, 2019, 12:02 AM IST
'आघाडीने निवडणुकीसाठी भाड्याची बुजगावणी उभी केली' title=

नागपूर : लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोर धरू लागला आहे. प्रत्येक पक्षाकडून आपल्या उमेदवाराचा जोरदार प्रचार केला जात आहे. युतीमधील रामटेकची जागा ही शिवसेनेच्या खात्यात आली आहे. रामटेकमधून शिवसेनेच्या कृपाल तुमाणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारासाठी आज शिवसेनाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी कळमेश्वर येथील कृषी बाजार समितीच्या मैदानात सभा घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे.

विदर्भातून एकूण ७ जागांसाठी येत्या ११ तारखेला मतदान होणार आहे. आजचा रविवार हा प्रचारातील अखेरचा रविवार होता. त्यामुळे प्रत्येक पक्षामध्ये आपल्या उमेदवाराचा प्रचार करण्याची लगबग पाहायला मिळाली.

आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी भाड्याचे बुजगावणे उभे केले आहेत. काँग्रेस पक्षामध्ये आत्मविश्वासाचा अभाव आहे. काँग्रेस पक्षात आत्मविश्वासाची उणीव असलेल्या लोकं असल्याची टीका केली उद्धव ठाकरे यांनी केली आहे. देशद्रोहासारखं गंभीर कलम हटवणं सहन करणार नाही. दाऊद परत आला तर त्याच्यावरील असलेले कलम काढणार का ? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. विदर्भ इतर गोष्टींसोबत संत्र्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. परंतू या संत्र्याला काँग्रेसने बदनाम केल्याचा आरोपही ठाकरेंनी केला.

राहुल गांधीनी देशद्रोह्यांना वाचवण्यासाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. आपल्याला देशद्रोह्यांना कडक शासन करत फासावर लटकवणारे सरकार हवयं की, त्यांचे लांगुलचालन करणारे सरकार हवे? असा प्रश्न उद्धव यांनी उपस्थितांना केला. माझं स्वप्न हे देशासाठी आहे, विरोधकांसारखे खुर्चीसाठी मी हापापलेलो नाही. असे ठाकरे म्हणाले.

शेतकऱ्यांनी आत्महत्या करु नयेत असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. शेतकऱ्याच्या पिकाला हमीभाव मिळावा यासाठी शिवसेना-भाजप पूर्णपणे कटीबद्ध आहे. शेतकऱ्यांची साथ कधीच सोडणार नाही, असे वचनदेखील दिले.