नवी मुंबई : नवी मुंबईतील भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी चक्क मतदारांना लोकसभेत दोन वेळा मतदान करण्याचे आवाहन केले आहे. कोपरखैरणे येथे युतीच्या माध्यमातून कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ठाणा लोकसभा उमेदवार राजन विचारे आणि सातारा लोकसभा उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित केली होती. यावेळी मंदा म्हात्रे यांनी हे वादग्रस्त विधान केले. यासंदर्भात मंदा म्हात्रे यांच्या विरोधात निवडणूक आयोगात तक्रार करण्यात आली आहे.
दोन्ही उमेदवार शिवसेनेचे असून पश्चिम महाराष्ट्रातील मोठी मतदार संख्या नवी मुंबईत वास्तव्यास आहे. विशेषता माथाडी वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी त्यांना सातारा येथे जावून शिवसेना उमेदवार नरेंद्र पाटील यांना २३ एप्रिल रोजी मतदान करण्याचे सांगितले. तर परत २९ एप्रिल रोजी ठाणे लोकसभेचे मतदान असल्याने परत येवून शिवसेना उमेदवार राजन विचारे यांना मतदान करण्याचे आवाहन केले.
मंदा म्हात्रे यांनी मतदारांना दोन वेळा मतदान करण्याचे आवाहन केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शरद पवार दोनवेळा मतदान करण्याचे आवाहन करू शकतात तर आपण का नाही करायचे अशा प्रकारे वक्तव्यही मंदा म्हात्रे यांनी केले आहे. दरम्यान याप्रकरणी आता विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे मंदा म्हात्रे यांच्या वक्तव्याची तक्रार केली आहे.