मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार हे माढ्यातून निवडणूक लढवणार का ? याबद्दल गेले काही महिने चर्चा रंगली होती. पण आता या शक्यतांवर पांघरूण पडले आहे. शरद पवार माढ्यातून निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मी स्वत: निवडणुकीला उभे न राहता नव्या पिढीतील उमेदवारांना संधी देणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.पराभवाच्या भितीने ही माघार घेतली नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले .एकाच घरातील दोघेजण आधीच निवडणूक लढवत आहेत, त्यात आता तिसरा नको असे म्हणत मी माघार घेतल्याचे शरद पवार यांनी सांगितले. आता माढा मतदार संघात राष्ट्रवादी कोण उमेदवार देणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. कुटुंबासोबत मिळून मी हा निर्णय घेतल्याचेही पवारांनी स्पष्ट केले. झी 24 तासंने यासंदर्भातील वृत्त दिले होते. यावर आता शिकामोर्तब झाले आहे.
ज्या मतदार संघामध्ये कटुता असेल ती संपवणे ही जबाबदारी मी माझ्याकडे घेतल्याचे शरद पवार यांनी सांगितले. काही ठिकाणी आम्ही ठरवलेल्या उमेदवारांमधील मतदार संघातही कटुता असेल तर मला ती संपवणे गरजेचे आहे. माढा संघातून मी निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. अजून यासंदर्भात पक्षाने उमेदवारी जाहीर केली नाही. आम्ही कुटुंबातही या गोष्टीचा विचार केला. त्यानंतर मी हा निर्णय घेतल्याचे शरद पवार म्हणाले. मावळमधून पार्थ पवार निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. फारसा अनुभव नसताना पार्थ यांना उमेदवारी देणे योग्य ठरेल का ? असा प्रश्न त्यांना यावेळी विचारण्यात आला. आम्ही सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला असून काम करणाऱ्या नव्या दमाचे उमेदवार आम्ही दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
आमच्या घरातून पार्थ पवार निवडणूक लढवणार नाहीत असे शरद पवारांनी घोषित केले होते. पण पार्थ पवारांनी आपला निवडणूक प्रचार थांबवला नव्हता. पार्थ यांनी निवडणूक लढवावी अशी अजित पवारांची इच्छा होती. राष्ट्रवादी नेते सुनील तटकरे यांनी देखील यासंदर्भातील वक्तव्य केले होते. निवडणूक प्रचारात पार्थ पवार पुढे गेले होते. अशावेळी ते नाराज होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. कौटुंबिक कलह टाळण्यासाठी शरद पवारांनी एक पाऊल मागे येत निवडणुकीतून माघार घेतल्याची चर्चा आहे.
ज्या माढातून लढण्यास त्यांनी अनुकुलता दाखवली होती तिथे स्थानिक कलह असताना मी तिथे लढतो असे त्यांचे म्हणणे होते. पण यातून पवारांनी माघार घेतली आणि आजोबांनी नातवासाठी ही जागा सोडल्याचे स्पष्ट झाले आहे.
NCP Chief Sharad Pawar: I thought that already two members of my family are contesting polls this time and hence I felt this is right time to take decision to not contest since I already have contested 14 times in the past pic.twitter.com/Q7ElDQqXte
— ANI (@ANI) March 11, 2019
जे लोकं पक्ष सोडून गेले आहेत आणि आता निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा राष्ट्रवादी येऊ इच्छितात त्यांना घेणार का ? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावेळी असे कित्येक येतात आणि जातात, माझ्या लक्षात नाही असे मिश्किल उत्तर देत त्यांनी हे उत्तर टाळले. भारतीय जनता पार्टीचा ग्राफ खाली जात आहे. लोकांनी त्यांनी जी आश्वासने दिली ती पूर्ण झाली नाहीत. शिवाजी महाराजांचे स्मारक झाले नाही. अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेन असे अनेक विषय आहेत जे भाजपाला पूर्ण करता आले नाहीत. असे महत्त्वाचे मुद्दे या निवडणूकीत आम्ही घेऊ असे ते म्हणाले.