निवडणुकांआधीच भाजपाच्या अडचणी वाढणार? अजित पवार गटाची 'ही' मागणी ठरणार कारण

Loksabha Election 2024 Ajit Pawar Group: 2023 मध्ये मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये अजित पवार गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 26, 2023, 12:50 PM IST
निवडणुकांआधीच भाजपाच्या अडचणी वाढणार? अजित पवार गटाची 'ही' मागणी ठरणार कारण title=
आतापासूनच पुढील वर्षातील निवडणुकांची चर्चा (प्रातिनिधिक फोटो)

Loksabha Election 2024 Ajit Pawar Group: लोकसभेच्या निवडणुकीबरोबरच राज्यातील विधानसभेची निवडणूक 2024 मध्ये होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय पक्षांच्या हलचाली सुरु झाल्या असल्या तरी 2 प्रमुख पक्षांमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने दोन्ही गटांकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. 2 पक्ष फुटून 4 गट तयार झाल्याने सत्तेत आणि विरोधातही शिवसेना तसेच राष्ट्रवादी पक्ष दिसून येत आहे. आता या दोन्ही गटांना त्यांच्यासोबत असणारे पक्ष किती जागा देणार यावरून चर्चा आतापासून सुरु झाल्या आहेत. शिंदे सरकारबरोबर सत्तेत असलेल्या अजित पवार गटाला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 48 पैकी किती जागांवर निवडणूक लढता येईल असा प्रश्न आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटाला महाविकास आघाडीकडून किती जागा सोडल्या जातील याबद्दलची उलट सुलट चर्चा आताच सुरु झाल्यात. अशातच भारतीय जनता पार्टी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हॅटट्रीकसाठी राज्यात जागावाटपासंदर्भात काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

भाजपा अडचणीत येणार?

जागावाटपावरुन चर्चांना उधाण आलेलं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामुळे भाजपा अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अजित पवार गट हा शिंदे गटाबरोबर भाजपाबरोबर सत्तेत आहे. त्यामुळेच आता लोकसभेला जागावाटपामध्ये जितका वाटा शिंदे गटाला मिळेल तितकाच वाटा आपल्यालाही हवा अशी अजित पवार गटातील पदाधिकारी आणि खासदारांची मागणी असल्याचं समजतं. जागा वाटपामध्ये शिंदे गटप्रमाणेच समसमान जागा वाटप करण्यात यावं अशी अजित पवार गटाची भूमिका असल्याची माहिती राष्ट्रवादीतील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. सध्या अजित पवार गटाचे 4 खासदार तर शिंदे गटाचे 13 खासदार पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सत्तेत आहेत.

'देवगिरी' निवासस्थानी महत्त्वाची बैठक

आपला गट हाच खरी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा करत सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार गटाचे प्रमुख असलेल्या अजित पवारांच्या नेतृत्वाखाली आज म्हणजेच 26 डिसेंबर रोजी मुंबईमधील 'देवगिरी' निवासस्थानी आमदार, खासदारांची बैठक पार पडणार आहे. तसेच सायंकाळी या ठिकाणी नियमितप्रमाणे होते तशी आमदारांची बैठकही पार पडणार असून त्यामध्ये लोकसभेबरोबरच विधानसभेच्या जागावाटपासंदर्भात चर्चा होईल असं मानलं जात आहे.

अचानक सरकारमध्ये सहभागी झाला अजित पवार गट

2023 मध्ये मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये अजित पवार गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील राजकारणामध्ये पुन्हा नवा भूकंप झाला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांबरोबरच 9 राष्ट्रवादीच्या आमदारांना मंत्रीपदाची शपथ घेतली. या बंडखोरीमुळे राष्ट्रवादीमध्ये अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट पडले. दोन्ही गटांमध्ये सध्या निवडणूक आयोगासमोर पक्ष, पक्ष चिन्हांवरुन निवडणूक आयोगासमोर वाद सुरु आहे. दोन्ही गटांनी पक्षावर आपलाच दावा सांगितला आहे. शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावेदारीवरुन होणारा कायदेशीर संघर्ष लांबण्याची चिन्हं सध्या तरी दिसत आहेत.