गणेश मोहळे, झी 24 तास, वाशिम: राज्याच्या कानाकोपऱ्यात कमी पैश्यात आणि सुखकर प्रवासासाठी एसटीची निवड केली जाते. लाखो प्रवासी ही सुविधा वापरत असतात. एसटी बस मधून प्रवास करताना सुट्ट्या पैश्यांची
अडचण नेहमी भासते. कधी कंडक्टरकडे पैसे नसतात तर कधी ग्राहकांकडे, हे आपल्याला प्रवासादरम्यान पाहायला मिळतेय यामुळे अनेकदा वाद झालेलेही आपण पाहिले असतील मात्र आता ही अडचणच दूर झाली आहे. एसटी प्रवाश्यांना थेट मोबाईलमधून फोन पे,गुगल पे सारख्या ऍपचा वापर करून तिकीट काढता येणार आहे.
देशात सध्या डिजिटल पेमेंट करणाऱ्यांची संख्या वाढली असून अगदी भाजीपाल्या पासून तर विमानाचे तिकीट काढण्यासाठी यूपीआय पद्धतीचा वापर केला जातो.आता हीच सुविधा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसने अर्थात एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांनाही मिळणार आहे.
वाहकाजवळ असलेल्या तिकिटांच्या मशीनमध्येच आता क्यू आर कोड जनरेट होणार असून तुमच्या मोबाईल मधल्या कुठल्याही डिजिटल पेमेंटच्या ऍप द्वारे तो स्कॅन करून तुम्ही तिकीट काढता येणार आहे.
सुट्टया पैश्यांवरून होणारे वाद टाळण्यासाठी आणि ग्राहकांच्या सोयीसाठी महामंडळाने ही सोय करून दिली आहे.सध्या मात्र मोजकेच प्रवाशी याचा लाभ घेत असून अनेक वाहकानांही याची माहिती नाही. त्यामुळे सर्व बस स्थानक आणि बसमध्ये याचा प्रसार होण्याची गरज व्यक्त होत आहे. सध्या मोनो, मेट्रोमध्ये प्रवाशांना ही सुविधा मिळतेय. राज्यातील सर्वदूर पोहोचणाऱ्या एसटीमध्ये ही सुविधा सुरु झाली तर गावागावातील प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.