महायुतीतील ठाणे आणि कल्याण लोकसभेचा वाद मिटला, शिंदे गटाला 'या' जागेचा दावा सोडावा लागणार?

Thane Loksabha: आता ठाणे-लोकसभा मतदार संघातील जागेवरुन शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद मिटला आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Apr 1, 2024, 01:32 PM IST
महायुतीतील ठाणे आणि कल्याण लोकसभेचा वाद मिटला, शिंदे गटाला 'या' जागेचा दावा सोडावा लागणार? title=
Thane Loksabha shivsena

LokSabha Election 2024: भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्यातील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटला नाहीय. यामध्ये ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदार संघ शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेचे बनवले आहेत. त्यामुळे ही जागा कोणाला मिळणार याबद्दल तर्क वितर्क लढवले जात होते. पण आता ठाणे-लोकसभा मतदार संघातील जागेवरुन शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद मिटल्याचे सांगण्यात येत आहे.खात्रीलायक सुत्रांनी झी 24 तासला ही माहिती दिली. भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये ठाणे आणि कल्याण लोकसभा जागेच्या मुद्द्यावरुन वारंवार बैठका होत होत्या. पण यातून काही मार्ग निघत नव्हता. दोन्ही पक्ष या जागांवर आपला दावा सांगत होते. अखेर ठाणे आणि कल्याणची जागा शिवसेना शिंदे गटाला मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

भाजपने ठाणे आणि कल्याण लोकसभेची जागा शिवसेनेसाठी सोडली आहे. असे असले तरी नाशिकवरील शिवसेनेचा दावा त्यांना मागे घ्यावा लागणार आहे. शिवसेनेला नाशिक सोडावे लागणार त्या बदल्यात ठाणे मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. 

2 दिवसात अंतिम निर्णय

महायुतीच्या जागावाटप संदर्भात मुख्यमंत्री यांच्यात बैठकी सुरू आहेत, सर्व जागा निवडून येतील अशी रणनीती आहे. 2 दिवसात कुणी कुठली जागा लढवणार हे स्पष्ट होईल, अशी माहिती शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी दिली.  नाशिक, सिंधुदूर्ग, संभाजी नगर या 3 ही जागा आमच्याकडे असतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय. 

त्या तिन्ही जागा आम्हालाच मिळतील...

भाजपने 24 जागा जाहीर केल्या आहेत. उर्वरित जागांची तयारी झालीय. आम्ही 16 ते 18 जागा लढवण्याचा तयारीत आहेत. 16 पेक्षा काम जागा आम्हाला मिळणार नाहीत, असे शिरसाठ म्हणाले. 

संभाजीनगरची जागा महत्वाची आहे. इथून सेनाप्रमुखांनी सुरुवात केली होती. याजागेसंदर्भात कालच बैठक झाली आहे. संभाजीनगरची जागा शिवसैनिकांना सुटावी अशी आमची मागणी आहे पण अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार असल्याचे शिरसाठ म्हणाले. 

उद्धव ठाकरेंवर टीका 

काल दिल्लीत टोमण्याचा नवा प्रयोग झाला. त्यांच्या भाषणाला शून्य प्रतिसाद होता. क्रमवारी पहिली तर स्वाभिमान कुठं गेला ते दिसले. आता तुमची जागा खूप खाली गेलीय.. त्यांचे दर्शन आता तुम्हाला घ्यावे लागेल आता पुन्हा स्वाभिमानाच्या गप्पा मारू नये, अशी टीका शिरसाठ यांनी ठाकरेंवर केली. 

नाशिकची जागा आम्ही घेणारच 

सुनील तटकरे काय जाहीर करतील माहीत नाही मात्र नाशिकची जागा आम्हाला मिळेल आम्ही ती घेणारच आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. 8 उमेदवार दिले आहेत कुणी कमजोर वाटत असेल तर मुख्यमंत्री कधीही ते उमेदवार बदलू शकतात, अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे.