मोठी अपडेट! सायंकाळी 6 वाजल्यानंतरही मतदान सुरु राहणार, निवडणूक आयोगाचा निर्णय

Election Commissions Decision: आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत जे मतदार मतदान केंद्रावरील रांगेत असतील त्या सर्वांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

Pravin Dabholkar | Updated: May 20, 2024, 06:30 PM IST
मोठी अपडेट! सायंकाळी 6 वाजल्यानंतरही मतदान सुरु राहणार, निवडणूक आयोगाचा निर्णय  title=
Polling Booth

Election Commissions Decision: महाराष्ट्रातील 13 मतदार संघात आज शेवटच्या टप्प्यातील मतदान होतंय. आधीच्या 4 टप्प्याप्रमाणे पाचव्या टप्प्यातही मतदानाची टक्केवारी कमी झालेली दिसून येत आहे. असे असले तरी काही ठिकाणी संथ गतीने मतदान सुरु असल्याचे पाहायला मिळाले. तसेच ईव्हीएम मशिन बंद असल्याचा प्रकारही समोर आल्याचे आरोप करण्यात आले. उद्धव ठाकरेंनी काहीवेळापुर्वी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. कितीही वेळ झाला तरी मतदान करा. सकाळचे 5 वाजले तरी चालतील, मतदानाचा हक्क बजावा..असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान निवडणूक आयोगाने महत्वाचा निर्णय घेतलाय.

आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत जे मतदार मतदान केंद्रावरील रांगेत असतील त्या सर्वांना मतदानाचा हक्क बजावता येईल अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी यांनी मतदारांना यासंदर्भात आवाहन केले आहे. 

संथ गतीने मतदान प्रक्रीया 

संथ गतीने मतदान प्रक्रीया सुरू असल्यामुळे मतदारांना तासंतास रांगेत ताटकळावं लागलं.. मुंबई आणि उपनगरात अशा अनेक घटना समोर आल्या.पवईमधील दोन मतदान केंद्रांवर अत्यंत धीम्या गतीने मतदान झालं. त्यामुळे मतदारांना काही तास रांगेत वेळ ताटकळावं लागलं. मोठ्या रांगा आणि उन्हाचा तडाखा यामुळे अनेक मतदार मतदान न करताच परत फिरल्याचं दिसून आलं. यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर यांनी संताप व्यक्त केलाय.

मुंब्रा येथील मतदान केंद्रावर मतदारांच्या प्रचंड मोठ्या रांगा 

मुंब्रा येथील मतदान केंद्रावर मतदारांच्या प्रचंड मोठ्या रांगा लागल्या होत्या..अनेक मतदान केंद्रांवर अशीच परिस्थीती असल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली. दरम्यान प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आव्हाड यांनी केलाय. 

 उद्धव ठाकरे संतापले

मुंबईत मतदानात सुरू असलेल्या दिरंगाईमुळे उद्धव ठाकरे संतापले... निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला... तसंच कितीही उशीर झाला तरी हटू नका मतदान करा, असं आवाहनही त्यांनी मतदारांना केलं. 

 घड्याळाच्या काट्यावर धावणारी मुंबई, ठाण्यासारखी शहरं.. मुंबईकरांना एक एक मिनीट महत्वाचा आहे.. मात्र निवडणूक आयोगाच्या सुस्तावलेपणामुळे अनेक मुंबईकर मतदानापासून वंचित राहिल्याचं पाहायला मिळालं.. त्यामुळे मुंबईकरांमध्ये प्रचंड संताप आहे. 

मतदान केंद्राबाहेर 300 हून अधिक मतदार 

पालघरच्या डहाणूतील वाघाडी येथे सहा वाजून गेले तरी देखील मतदान केंद्राबाहेर 300 हून अधिक मतदार रांगेत उभे असल्याच समोर आल आहे . या मतदान केंद्रावर असलेलं ईव्हीएम मशीन स्लो चालत असल्याने मतदानास विलंब होत असल्याचा आरोप वाघाडी ग्रामपंचायत चे सरपंच यांनी केला आहे . सहा वाजून गेले असताना देखील शेकडो मतदार रांगेत ताटकळत उभे असून सकाळपासून हीच परिस्थिती असताना देखील प्रशासनाने कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याचा आरोप देखील वाघाडी ग्रामपंचायतचे सरपंच यांनी केला आहे.