तुमची 'नमोनिर्माण सेना' का झाली? राऊतांचा राज ठाकरेंना सवाल; शाहांचा उल्लेख करत म्हटले, 'कोणती फाईल..'

Raj Thackeray Support BJP Sanjay Raut Reacts: मंगळवारी सायंकाळी मुंबईतील दादारमधील शिवाजी पार्क मैदानामध्ये आयोजित केलेल्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी आपली भूमिका जाहीर केल्यानंतर राऊतांनी साधला निशाणा.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 10, 2024, 11:06 AM IST
तुमची 'नमोनिर्माण सेना' का झाली? राऊतांचा राज ठाकरेंना सवाल; शाहांचा उल्लेख करत म्हटले, 'कोणती फाईल..' title=
संजय राऊतांना राज ठाकरेंना सवाल

Raj Thackeray Support BJP Sanjay Raut Reacts: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंना केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी दिल्लीत अशी कोणती फाइल दाखवली की त्यांनी मुंबई येऊन थेट भाजपाला समर्थन जाहीर केलं? असा सवाल उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. राज ठाकरेंनी मंगळवारी मसनेच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. यानंतर पहिली प्रतिक्रिया नोंदवताना संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेवर त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

आधी ते शत्रू म्हणत होते

"ते काही काळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांना महाराष्ट्राचे शत्रू आहेत असं सांगत होते. महाराष्ट्रात पाऊल ठेऊ देऊ नका, ते महाराष्ट्राचे दुश्मन आहेत त्यांना राज्यात पाऊल ठेऊ देऊ नका असं आवाहन जनतेला करत होते. आता अचानक असा हा कोणता चमत्कार, साक्षात्कार झाला हे तुम्ही त्यांना जाऊन विचारलं पाहिजे. असं काय झालं की तुम्ही अचानक पलटी मारुन महाराष्ट्राच्या शत्रूंना पाठिंबा देत आहात. जनतेला काय उत्तर देणार? यामागील कोणतं कारण आहे? कोणती फाइल उघडली आहे? कोणती फाईल तुम्हाला दाखवली की मुंबईत आल्यानंतर तुम्ही थेट त्यांना समर्थन जाहीर केलं," असा सवाल राऊत यांनी विचारला आहे. तसेच पुढे बोलताना राऊत यांनी, बरं झालं उघड समर्थन दिलं. नाहीतर उमेदवार उभे करा, मतं खा हे राजकारण चांगलं नाही, असंही म्हटलं.

नमोनिर्माण सेना का झाला?

संजय राऊत यांनी मनसेचा नमोनिर्माण सेना पक्ष का झाला असा खोचक सवालही विचारला. "त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. महाराष्ट्रातील गेल्या काही दिवसांपासून जी लूट सुरु आहे. महाराष्ट्रात जे अत्यंत घाणेरडं खोक्याचं राजकारण सुरु आहे. या साऱ्याचे सूत्रधार नरेंद्र मोदी आणि अमित शाह आहेत. महाराष्ट्रातून उद्योग पळवला जातो, मुंबई तोडण्याचा प्रयत्न होतो, मुंबईला विकलांग करण्याचा प्रयत्न सर्वांना माहिती आहे. अशावेळेला महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी निर्माण झालेला एक पक्ष महाराष्ट्राच्या शत्रूंना पाठिंबा देत असेल तर लोकांच्या मनात शंका निर्माण होतात. त्याची उत्तरं तुम्हीच द्यायची आहेत. असं काय घडलं की तुम्हाला अचानक या महाराष्ट्राच्या शत्रूंना पाठिंबा द्यावा वाटला. याबाबत लोक त्यांना प्रश्न विचारतील. तुमचा जो पक्ष आहे त्याचा नमोनिर्माण पक्ष का झाला? नमोनिर्माण पक्ष होण्याची अचानक का गरज पडली? हे त्यांनी सांगावं. त्यांच्या पक्षाने कोणती भूमिका घ्यावी हा त्यांचा निर्णय आहे. आम्ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, अस्मितेसाठी लढत आहोत. समोर मोदी असतील किंवा अमित शाह असतील तरी आम्ही शरणागती पत्कारणार नाही," असं राऊत म्हणाले.

नक्की वाचा >> नव्या भूमिकेनंतर राज ठाकरेंना धक्का! मोठा नेता पक्ष सोडत म्हणाला, 'भाजपाबरोबर जाण्याने मराठी..'

राजकीय व्याभिचारावरुन टोला

"राजकीय व्याभिचार कशाला म्हणतात हे प्रबोधनकार ठाकरेंच्या भाषणातून, लेखणातून समाजून घेतलं पाहिजे. आम्ही प्रबोधनकारांचे विचार मानणारे आहेत. उद्धव ठाकरे तर त्यांचे नातून आहेत. राज्यातील ओवाळून टाकलेले भ्रष्टाचारी आणि व्याभिचारी यांना भाजपाने आपल्याकडे घेतलं आहे? त्यातले एक हे महाशय आहेत का नमोनिर्माणवाले? मला असं वाटत नाही. राज्यातील सर्व ओवाळून टाकलेले भ्रष्टाचारी, व्याभिचारी, गुंड यांना आपल्या पक्षात, वॉशिंग मशिनमध्ये घेऊन साफ करणं हा व्याभिचार नाही का? त्याच व्यासपीठावर आपण पाऊल ठेवलं असेल तर याचं उत्तर आपल्याला जनतेला द्यावं लागेल. हा त्यांचा निर्णय आहे. त्यावर त्यांनी बोललं पाहिजे," असं संजय राऊत राज ठाकरेंना उद्देशून म्हणाले.