LokSabha Election 2024: मित्रपक्षांचा आणि पक्षांतर्गत विरोध असतानाही भाजपाने अमरावतीमधून नवनीत राणा यांना तिकीट देत रोष ओढावून घेतला आहे. प्रहार संघटनेचे बच्चू कडू आणि शिंदे गटाचे अनंत अडसूळ यांनी आपली नाराजी जाहीर बोलून दाखवली आहे. बच्चू कडू यांनी तर जाहीरपणे नवनीत राणा यांना विरोध केला असून, काही करुन त्यांना पाडणार असा निर्धार व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर अमरावतीत सध्या राणा आणि बच्चू कडू यांच्यात वाकयुद्ध रंगल्याचं चित्र आहे.
साडेतरा रुपयांची साडी देऊन मेळघाटची बेइज्जती केली अशी सणसणीत टीका बच्चू कडू यांनी केली आहे. साडेतरा रुपयांची साडी मतपरिवर्तन करु शकत नाही असंही ते म्हणाले आहेत. दरम्यान त्यांच्या या टीकेला रवी राणा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. काहीजण आंतरराष्ट्रीय नेते, प्रवक्ते झाले असून फक्त नौटंकी करतात असं रवी राणा म्हणाले आहेत.
"साडे सतरा रुपयांची साडी देऊन मेळघाटची बेइज्जती करुन टाकली. 2 कोटींच्या गाडीतून फिरायचं आणि साडेतरा रुपयांच्या साडीत लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था मोडून काढली पाहिजे. मेळघाटात वाटलेली साडे सतरा रुपयांची साडी मतपरिवर्तन करु शकत नाही," असं बच्चू कडू जाहीर सभेत म्हणाले होते.
"मला टीका करणाऱ्यांना इतकंच सांगायचं आहे की, मी शेतकऱ्यांसाठी 4 ते 5 वेळा जेलमध्ये गेलो. शेतकऱ्यांसाठी 4 ते 5 वेळा अन्नत्याग केला. सरकार कोणतंही असलं तरी मी शेतकऱ्यांचा प्रश्न आला तेव्हा लढलो. काही लोक फक्त राजकारण, नौटंकी करत आहेत. ते आंतरराष्ट्रीय नेते, प्रवक्ते झाले आहेत. ते आंतरराष्ट्रीय नेते झाल्याने काहीही बोलू शकतात. ते फार मोठे नेते असून, मी छोटा कार्यकर्ता आहे", असा टोला रवी राणा यांनी लगावला आहे.
दरम्यान नितीन गडकरी यांच्यानंतर नवनीत राणा सर्वाधिक मतांनी निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे. बच्चू कडू नवनीत राणांचं डिपॉझिट जप्त होईल असं विधान केलं होतं. त्यावर उत्तर देताना रवी राणा यांनी हे विधान केलं.
"अमरावती जिल्ह्याच्या बाबतीत ब्रह्मदेव खाली आले तरी शक्य नाही. नवनीत राणांचं डिपॉझिट जप्त करु," असं बच्चू कडू म्हणाले होते. त्यावर रवी राणा म्हणाले की, "विदर्भात नितीन गडकरींनंतर नवनीत राणा सर्वाधिक मतांनी निवडून येतील. त्या 3 लाखांच्या मताधिक्क्याने जिंकून येतील".