'पवार संपले म्हणणाऱ्या नेत्याला अडीच वर्ष...'; शरद पवारांचा फडणवीसांना पॉवरफूल टोला

Loksabha Election 2024 Sharad Pawar Slams Devendra Fadnavis: लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीदरम्यान शरद पवारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत त्यांना विरोधी पक्षात बसायला लागलं याची आठवण करुन दिली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 3, 2024, 10:04 AM IST
'पवार संपले म्हणणाऱ्या नेत्याला अडीच वर्ष...'; शरद पवारांचा फडणवीसांना पॉवरफूल टोला title=
शरद पवारांचा फडणवीसांना टोला

Loksabha Election 2024 Sharad Pawar Slams Devendra Fadnavis: लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला 2 आठवड्यांहूनही कमी वेळ शिल्लक राहिला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील 5 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडणार आहे. असं असतानाच दुसरीकडे अनेक जागांसंदर्भातील संभ्रम कायम असल्याने महायुती आणि महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा तिढा सुरुच आहे. एकीकडे जागा वाटप सुरु असतानाच वेगवगेळ्या मतदारसंघांमधून उमेदवारी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांकडून शक्तीप्रदर्शन केलं जात आहे. अनेक चर्चेतील मतदारसंघांमध्ये थेट वरिष्ठ नेते उमेदवाराच्या प्रचार्थ रॅलीमध्ये सहभागी होताना दिसत आहेत. याच ठिकाणी नेत्यांची खणखणीत भाषणं होत असून त्यामधून विरोधकांवर निशाणा साधण्याची एकही संधी राजकारणी सोडत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी असाच एक टोला आता राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे.

पवारांचा फडणवीसांना टोला

2019 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यातील भारतीय जनता पार्टीची आणि शिवसेनेची युती मुख्यमंत्रीपदाच्या वादावरुन तुटली. त्यानंतर राज्यात शरद पवार यांच्या पुढाकाराने महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यात आला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या सरकारचं मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरेंनी भुषवलं. 2019 निवडणुकीच्या आधीपासूनच शरद पवारांवर भाजपाने शऱद पवारांविरोधात टीका करण्यास सुरुवात केली होती. शरद पवारांना लक्ष्य करणाऱ्या भाजपा नेत्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश होता. मात्र त्या काळात फडणवीसांनी केलेल्या एका विधानाची आठवण करुन देत आता शरद पवारांनी खास आपल्या शैलीत समाचार घेतला आहे. 

पवारांना काय प्रश्न विचारण्यात आला?

वर्ध्यातून अमर काळे आणि यवतमाळमधून संजय देशमुख या महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरले त्यावेळेस शरद पवारांनी हजेरी लावली. याचवेळी शरद पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांनी शरद पवारांचे राजकारण संपले आहे, असं बोललं जात आहे असा उल्लेख करत प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवारांनी सूचक पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत महाविकास आघाडी सरकारची घडी आपणच बसवली असल्याचा संदर्भ देत टोला लगावला.

नक्की वाचा >> निवडणुका सुरु झाल्यावर मनसे महायुतीत? आदित्य ठाकरेंचे संकेत; म्हणाले, 'आम्हाला भाजपाकडून...'

थेट नाव न घेता फडणवीसांना टोला

"महाराष्ट्रात एक नेता आहे. जो सध्याच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहे. 5 वर्षांपूर्वी प्रत्येक सभेत शरद पवार संपले असं ते म्हणत होते. मात्र निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर अशी परिस्थिती होती की पुढले अडीच वर्ष शरद पवारांच्या सहकाऱ्यांनी सरकार चालवले. त्यावेळी या नेत्याला विरोधी पक्षात बसावे लागले," असं उत्तर शरद पवारांनी वर्ध्यातील पत्रकार परिषदेत दिलं.

फडणवीस नेमकं काय म्हणाले होते?

2019 च्या एका मुलाखतीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी एका मुलाखतीत, शरद पवारांच्या राजकारणाचं पर्व संपलं, असं विधान केलं होतं. त्यावेळेस शरद पवारांनी कोणतंही उत्तर दिलं नव्हतं. मात्र 2019 ला शिवसेनेचं भाजापाशी फिस्कटल्यानंतर शिवसेनेला जवळ करत त्यांनी महाविकास आघाडीची घडी बसवली होती. अडीच वर्ष शरद पवारांच्या सहकाऱ्यांनी सरकार चालवले, या आपल्या वाक्यातून पवारांना हेच सूचत करायचं होतं.