Uddhav thackeray parbhani ralley video : पाऊस आणि प्रचारसभा यांचं समीकरण कायमच चर्चेचा विषय ठरतं. यावेळी हाच पाऊस उद्धव ठाकरे यांच्या परभणीतील सभेसाठी हजेरी लावताना दिसला आणि या सभेतील अनेक व्हिडीओ आणि फोटोंनी पाहता पाहता सोशल मीडियावर गर्दी केली. लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर (Loksabha Election 2024) परभणी मतदारसंघातील महाविकासआघाडीच्या वतीनं निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या संजय जाधव (Parbhani Sanjay Jadhav) यांच्या प्रचारासाठी उद्घव ठाकरे यांच्या जाहीर सभेचं परभणीत आयोजन करण्यात आलं होतं.
ठाकरे भाषणासाठी व्यासपीठावर आले, उपस्थित समर्थकांनी त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरू केली आणि पाहता पाहता या सभेला एक वेगळं रुप मिळालं. तितक्यातच सोसाट्याचा वारा आणि जोरदार पावसानंही हजेरी लावली आणि या भर पावसातही ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधत शाब्दिक तोफ डागणं सुरूच ठेवलं. पावसाला सुरुवात होऊनही उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी आलेल्या समर्थकांनीही सभास्थळ न सोडता तिथंच थांबून त्यांना पाठिंबा दिला आणि या दृश्यानं ठाकरे गटाचं मनोधैर्य दुपटीनं वाढलं.
परभणीतील सभेत भाजपचं नामकरण करत उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. भाजपा म्हणजे भाकड जनता पक्ष म्हणत उद्धव ठाकरेंनी डिवचलं. जुमला 1 आणि 2 नंतर भाजपने आता 2024 ला जुमला तीन मालिका सुरु केल्याची बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी केली. अभिनेता तोच, खलनायकही तोच... कितीवेळा ही मालिका बघायची? असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.
दरम्यान, सभास्थळी पावसाला सुरुवात झाल्यानंतर, आपण संकटांना घाबरणार नाही, कारण परभणी हा माझ्या सेनेचा बालेकिल्ला आहे. मिंदेना सगळं पैशानं खरेदी करता येतं असं वाटलं असेल, पण परभणीकर पैशाने विकले जात नाहीत अशा शब्दांत उपस्थितांचा विश्वास जिंकला.
वादळाला अंगावर घेणारा वाघ उभा आहे. pic.twitter.com/JDE2gX3zCc
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) April 23, 2024
ही जनता म्हणजे माझी वाघ नखं आहेत. pic.twitter.com/PBOjwpIBas
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) April 23, 2024
निवडणूक आयोग म्हणजे मोदी आणि शहांचा नोकर असून, पक्षाच्या गीतातून 'जय भवानी' शब्द काढण्याच्या आयोगाच्या मागणीवरही त्यांनी टीका केली. 'तुम्हाला उद्धव ठाकरे संपवायचा आहे, बघा प्रयत्न करून, हा महाराष्ट्र माझ्यासोबत उभा आहे', असं म्हणत त्यांनी पक्षाला साथ देणाऱ्या प्रत्येकाप्रती आश्वासक वक्तव्य केलं. उद्धव ठाकरे यांच्या भाषणादरम्यान बरसलेला पाऊस या सभेतील खरा हिरो ठरला. सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर असणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी परभणीच्या सभेत पाहुणा कलाकार म्हणून आलेला आणि गाजलेला हाच पाऊस आता राजकीय गणितांमध्ये पक्षाला नेमकी कशी आणि किती मदत करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.