Supriya Sule On Ajit Pawar Controversial Comment: लोकसभेच्या बारामती मतदारसंघातून आज महाविकास आघाडीच्या उमेदवार तसेच विद्यमान खासदार सुप्रिया सुळे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सुप्रिया सुळेंच्याविरोधात याच मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या अजित पवारांच्या पत्नी तसेच महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. असं असतानाच आता सुप्रिया सुळेंनी अजित पवारांनी केलेल्या 'कचा-कच बटण दाबा' या विधानावर मोजक्या शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवली आहे.
पुण्यामध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळेंनी शरद पवारांवर होत असलेली टीका, निवडणुकीसंदर्भातील प्रश्नांना उत्तरं दिली. शरद पवारांवर भाजपाकडून होत असलेल्या टीकेवरुन सुप्रिया सुळेंनी, "शरद पवारांना किंवा कुणाहीविरोधात कश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत सत्ता असलेल्यांना षड्यंत्र करावं लागतंय हे मान्य करावं लागलं याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आदरणीय चंद्रकांतदादा अनेकदा हेच म्हणाले आहेत की शरद पवारांना आम्हाला संपवायचं आहे. त्यामुळे ही लढाई एका विचाराला, देशामध्ये ज्या नावाकडे विश्वासाने पाहिलं जातं, जे गेले सहा दशकं महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणात राहिलं आहे त्या शरद पवारांना संपवण्यासाठी आहे. हे एक षड्यंत्र आहे. सातत्याने बोलतात एक. शेवटी त्यांच्या मनातली आणि पोटातली गोष्ट बाहेर आहे," असं म्हणत टीका केली.
शरद पवारांना, तुम्हाला अगदी विरोधात असलेल्या अजित पवार आणि सुनेत्रा पवारांना बारामतीत प्रचारासाठी अडकून रहावं लागलं आहे, असं म्हणत सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारण्यात आलं. या प्रश्नाला उत्तर देताना सुप्रिया सुळेंनी, "शरद पवार बारामतीमध्ये कुठे आहेत? ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत," असं म्हटलं.
सुप्रिया सुळेंना अजित पवारांकडून केल्या जात असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारण्यात आला. गेली 15 वर्ष तुम्ही काहीच विकास केला नाही असं अजित पवार म्हणत आहेत. तुम्हाला जे पाहिजे ते मी देतो, आमचं बटण कचा-कच दाबा. आता सारवासारव करत ग्रामीण भाषेत बोललोय असं ते म्हणालेत, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर सुप्रिया सुळेंनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये उत्तर देताना, "माझं या सगळ्याला एकच उत्तर आहे, राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी!" असं म्हटलं.
नक्की वाचा >> ठाकरे गटाकडून नवनीत राणांचे कौतुक; ‘वॉर रुकवा दी पापा’चाही उल्लेख
आज अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवारांबरोबर पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन आरती केली. सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कचा-कच बटण दाबा या विधानावरुन बोलताना अजित पवारांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या एका भाषणाचा उल्लेख केला. अगदी हात जोडून अजित पवारांनी या कचा-कचा शब्दाचा वापर का केला हे सांगतानाच पुढे हा विषय वाढवून नये अशी अपेक्षा व्यक्त केली. "एका भाषणात राहुल गांधींनी एका भाषणात आम्ही तुमच्या अकाऊंटला खटाखट खटाखट पैसे टाकू असं काहीतरी ते म्हणाल्याचं मला सकाळी कोणीतरी सांगितलं. ते खटा-खटा म्हणाले. मी म्हणालो कचा-कचा. आमच्या ग्रामीण भागातील तो शब्द आहे. याचा फार पुढे बाऊ करुन नये अशी आमची अपेक्षा आहे," असं अजित पवार म्हणाले.