Loksabha Election 2024 Sanjay Raut On Congress: लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानामध्ये महाराष्ट्रातील 5 लोकसभा मतदारसंघांमध्ये पुढील 2 आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत मतदान होणार आहे. असं असताना दुसरीकडे 48 पैकी उर्वरित 43 जागांवरुन महायुतीबरोबर महाविकास आघाडीमध्येही जागावाटपावरुन वाद सुरुच आहेत. एकमेकांच्या मतदारसंघांवर केले जाणारे दावे, प्रतिदावे आणि मित्रपक्षातील नेत्यांनाच टोमणे मारण्यात आल्याचे प्रकार मागील काही दिवसांपासून अनेकदा घडले आहेत. त्यातही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सांगलीच्या जागेवर चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केल्याने ठाकरे गट आणि काँग्रेसमधील वाद विकोपाला गेला आहे. या मतदारसंघात ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा न देण्याची भूमिका स्थानिक काँग्रेस नेत्यांनी घेतली आहे. सांगलीवरुन सुरु असेल्या गोंधळादरम्यान आज सांगली दौऱ्यावर असेलल्या संजय राऊत यांनी या जागेवरुन थेट महाविकास आघाडीत उभी फूट पडू शकते असे संकेत दिले आहेत.
सांगलीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी काँग्रेसवर कठोर शब्दांमध्ये टीका करत तुम्ही राष्ट्रीय पक्ष आहात हे विसरु नका असा खोचक सल्ला देतानाच महाविकास आघाडीसंदर्भात सूचक विधान केलं. "सांगलीची जागा हा काँग्रेससाठी वादाचा विषयच नाही. सांगलीची जागा ही महाविकास आघाडीची असून महाराष्ट्रातील 48 जागा कोणत्याही एका पक्षाच्या नाहीत. त्या साऱ्या महाविकास आघाडीच्याच आहेत. आघाडी म्हणून एकत्र लढल्यास चांगले परिणाम दिसतील. याचा फायदा केंद्रामध्ये काँग्रेसलाच होईल. सांगलीची लढतही काँग्रेसचा पंतप्रधान करण्यासाठीच आहे. जर काँग्रेसला त्यांचा पंतप्रधान नको असेल तर तसं जाहीर करावं. काँग्रेसचा पंतप्रधान व्हावा यासाठी प्रत्येक जागा जिंकून आणणं आवश्यक आहे. काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाने राष्ट्रीय पातळीवर राजकारण करावं. गल्लीत फारसं लक्ष देऊ नये," असा खोचक सल्ला राऊत यांनी काँग्रेसला दिला.
राऊत इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी काँग्रेस सांगलीच्या जागेवरुन आडमुठी भूमिका घेणार असेल तर महायुतीमध्ये फूट पडू शकते असे संकेत दिलेत. "आला तर तुमच्यासोबत नाहीतर तुमच्याशिवाय निवडणूक लढवली जाईल," असं राऊत यांनी काँग्रेसला सुनावताना म्हटलं आहे. "राष्ट्रीय पक्षाने राष्ट्रीय स्तरावर रहावे. त्याच उंचीवर त्यांनी रहाणं अपेक्षित आहे. सांगलीमध्ये काय होतं ते आम्ही पाहू. इंडिया आघाडी सत्तेत आली तर शिवसेना किंवा शरद पवार पंतप्रधान बनणार नाहीत. काँग्रेसचाच पंतप्रधान होणार आहे. अशा स्थितीत हे असले रुसवे-फुगवे बरे नाहीत. इतर मतदारसंघांमध्ये आम्ही जिंकत असूनही ते काँग्रेसला दिले आहेत. असं असताना सांगलीबद्दल नाराजीचं कारण काय?" असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.
नक्की वाचा >> अलिबागचं नाव बदलण्याची मागणी! CM शिंदेंना पत्र; 'हे' नाव देण्याचा सल्ला, स्थानिकांचा विरोध
राऊत यांनी यापुढे जात काँग्रेससाठी ठाकरे गटाने अनेक पारंपारिक मतदारसंघ सोडल्याचं सांगितलं. काँग्रेसच्या तिकीटावर उभ्या असलेल्या छत्रपती शाहू महाराजांचा उल्लेखही राऊत यांनी केला. "रामटेकमध्ये आमचा विद्यमान खासदार असूनही आम्ही ती जागा काँग्रेससाठी सोडली. कोल्हापूरमधून छत्रपती शाहूंना पाठिंबा दिला. अमरावतीच्या जागेवर शिवसेना 30 वर्षांपासून लढत असतानाही ती आम्ही काँग्रेसला दिली. त्यामुळेच सांगलीसाठी काँग्रेसने इतका तिढा निर्माण करु नये. आम्ही उमेदवार मैदानात उतरवला आहे. त्यामुळे आलात तर तुमच्यासोबत नाहीतर तुमच्याशिवाय याच धोरणाने आम्ही आतापर्यंत वाटचाल केली आहे आणि तेच आमचं धोरण राहील," असं राऊत म्हणाले.
नक्की वाचा >> सर्वांना 25 लाखांचा कॅशलेस विमा, 50%+ आरक्षण, समलैंगिक संबंधांना मान्यता अन्..; काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील मुद्दे
केवळ सांगलीच नाही तर भिवंडी मतदारसंघाचाही विषय महाविकास आघाडीच्या चर्चेतून बाद झाला असल्याचं संजय राऊतांनी सांगितलं. भिंवंडीत राष्ट्रवादीने आपला उमेदवार जाहीर करुन प्रचार सुरु केला आहे. तिथं आम्ही त्यांना पाठिंबा दिला असून प्रचारातही उथरणार आहोत. काँग्रेसनेही आमच्या उमेदवाराला पाठिंबा देत त्याच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे, असं राऊत म्हणाले.