'...त्यावेळी मोदी कुठे गेले होते?' उद्धव ठाकरेंचा रोखठोक सवाल, म्हणाले 'गुजरातबद्दल माझ्या मनात...'

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना वृत्तपत्राला एक रोखठोक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यावेळी मोदी कुठे गेले होते, असा सवाल उपस्थित केला. 

Updated: May 12, 2024, 08:27 AM IST
'...त्यावेळी मोदी कुठे गेले होते?' उद्धव ठाकरेंचा रोखठोक सवाल, म्हणाले 'गुजरातबद्दल माझ्या मनात...' title=

Uddhav Thackeray on PM Narendra Modi : सध्या राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. येत्या 13 मे रोजी राज्यातील चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वत्र प्रचारसभा, रॅली, घोषणा यांचा पाऊस पडताना दिसत आहे. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना वृत्तपत्राला एक रोखठोक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यावेळी मोदी कुठे गेले होते, असा सवाल उपस्थित केला. 

उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या मुलाखतीत निवडणुका, कोरोना, राम मंदिर, यंत्रणा यावर भाष्य केले. यावेळी त्यांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिंदे सरकारवर जोरदार निशाणा साधला. यावेळी उद्धव ठाकरेंना नरेंद्र मोदी यांच्या राज्यातील प्रचारसभांबद्दल विचारणा करण्यात आली. नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये प्रचार सभांचा धडाका लावतायत, गल्लीबोळांत फिरतायत. एक-दोन दिवसांत ते घाटकोपर भागातही रोड शो करणार आहेत. त्याच घाटकोपरमध्ये काल अनेक गुजराती सोसायटय़ांमधून शिवसैनिकांना म्हणजे मराठी माणसाला प्रचार करण्यापासून रोखण्यात आलं. हे तुम्ही किती गांभीर्याने घेताय? असा प्रश्न यावेळी उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला.

त्यावर ते म्हणाले, "हाच तर निकाल आता या वेळच्या निवडणुकीत लागणार आहे. मराठी माणसं या पद्धतीने कधीही कुठल्याही राज्यात दादागिरी करत नाहीत; पण हे कोणाच्या आशीर्वादाने घडतंय? आणि त्यांना म्हणजेच मराठी द्वेष्टय़ांना बळ देण्यासाठी मोदी इकडे रोड शो करणार आहेत का? हा प्रश्न आहे. मराठी माणूस दाखवेल नं त्यांना काय दाखवायचंच ते!"

याने कोरोना जात नाही

"पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, भले गुजराती असतील, उत्तर भारतीय असतील, अगदी मुस्लिमसुद्धा… कोरोना काळामध्ये आपण जे काम केलं, ते हे लोक कधीच विसरलेले नाहीयेत. मी जात व प्रांतभेद केला नाही. कधीच नाही. उत्तर प्रदेशात गंगेत प्रेतं वाहत होती. गुजरातमध्ये सामूहिक चिता पेटल्या होत्या. महाराष्ट्रामध्ये असं नव्हतं कधी घडलं. त्या वेळेला मोदी रिकाम्या थाळय़ा वाजवत होते. दिवे लावा, दिवे विझवा, कोलांटउडय़ा मारा, बेडूकउडय़ा मारा, उठा-बशा काढा… याने कोरोना जात नाही. कोरोना यामुळे नाही गेला", असा घणाघातही उद्धव ठाकरे यांनी केला. 

गुजरातही आमचाच आहे; पण...

"मला एका गोष्टीचं समाधान आहे. महाराष्ट्राच्या जनतेला मी जे जे काय सांगत गेलो, ते ते ती ऐकत गेली. त्यांच्यात मी कुठेही भेदभाव केला नाही. या पलीकडे जाऊन मी सांगतो, गुजरातबद्दलदेखील माझ्या मनात काही आकस नाहीये. गुजरातही आमचाच आहे; पण हाच भाव गुजराती माता, बंधू-भगिनींनीही ठेवलाच पाहिजे. जे इथे राहतात. उलट 92-93 साली शिवसेनेनेच त्यांना वाचवलं. मोदी कुठे होते त्या वेळी?" असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.