लंडनहून आणली जाणारी वाघनखं महाराजांची नाहीत? म्युझियमनेच केला मोठा खुलासा

London tiger Claws:महाराष्ट्र सरकार कोट्यावधी रुपये खर्च करून लंडनमधून छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खान वधावेळी वापरलेली वाघ नखे आणत असल्याचा दावा केला आहे.

Updated: Jul 8, 2024, 05:44 PM IST
लंडनहून आणली जाणारी वाघनखं महाराजांची नाहीत? म्युझियमनेच केला मोठा खुलासा title=
London Waghnakh

London tiger Claws: महाराष्ट्र सरकार कोट्यावधी रुपये खर्च करून लंडनमधून छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खान वधावेळी वापरलेली वाघ नखे आणत असल्याचा दावा केला आहे. पण प्रत्यक्षात आणली जाणारी वाघनखे ही छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खान याच्या वधा वेळी वापरली असल्याचे कोणतीच पुरावा नसल्याचे स्पष्टीकरण लंडन स्थित विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने दिले आहे. 

इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना केलेल्या पत्र व्यवहारात विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने हे स्पष्टीकरण दिले आहे. सरकारने आजपर्यंत या वाघ नखे संदर्भात जे जीआर काढले त्यामधे छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खान वधावेळी वापरलेली वाघनखं असा उल्लेख केला आहे. पण प्रत्यक्षात सरकारचा हा दावा पूर्णतः चुकीचा आणि शिवप्रेमींची फसवणूक करणारा असल्याचे 17 जूनला विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने दिलेल्या स्पष्टीकरणावरून दिसून येत आहे. सध्या महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रातल्या विविध शहरात लंडन मधुन आणण्यात येत असलेली वाघ नखे ठेवण्यासाठी कोट्यावधी रूपये खर्च करून शिवशस्त्रशौर्य प्रदर्शन भरवीत आहे.

प्रत्यक्षात ही वाघ नखे छत्रपति शिवाजी महाराज यांची नसताना महाराष्ट्र सरकार कोट्यवधी रुपये खर्चून खोटं का बोलत आहे असा सवाल इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत करत आहेत. 

या प्रकरणातील काही महत्वाच्या बाबीः

विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझीअम, लंडन यांच्याकडून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना पाठवलेल्या पत्रांमध्ये, महाराष्ट्रात भाडेतत्त्वावर आणण्यात येणारी वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत याचा कोणताही पुरावा नसल्याची कबुली.

 विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझीअम, लंडन यांच्याकडून 19 जून 2024 रोजी पाठवलेल्या पत्रात, सदार वाघनखे 1971 या साली म्यूजियमकडे भेट म्हणून आल्याची माहिती.

विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझीअम, लंडन यांच्या संग्रहात भारतातील विविध ठिकाणांकडून आलेली एकूण 6 वाघनखे.

यामुळे विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझीअम यांच्याकडे असणाऱ्या वाघनखां बाबत म्युझीअम संभ्रमावस्थेत.

इतिहास सशोधक यांनी लंडन मधील वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची नसल्याचे सादर केलेले पुरावे विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझीअम यांनी मान्य केले असून, त्यानुसार म्युझीअमकडे असणाऱ्या माहितीत बदल केला आहे.

जर वाघनखे महाराष्ट्रात आणली गेली तर ही खरी माहिती महाराष्ट्र सरकारने जिथे जिथे वाघनखे प्रदर्शित केली जातील तिथे तिथे ठळकपणे मांडावी आशा सूचना महाराष्ट्र सरकारला दिल्या आहेत.

 सध्या महाराष्ट्रात आणली जात असणारी वाघनखे ज्या ग्रँट डफ नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याच्यां परिवाराकडून भेट म्हणून देण्यात आली, त्या इंग्रज अधिकाऱ्याकडे ही वाघनखे कशी आली याची देखील माहिती नाही. फक्त असा अंदाज सांगण्यात येतो की ती वाघनखे 1818 साल च्या दरम्यान त्याच्याकडे आली.

ग्रँट डफच्या मुलाने जेंव्हा सातारच्या छत्रपतींना भेट दिली तेव्हा त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची अस्सल वाघनखे तिथे पाहिल्याची नोंद आपल्या पुस्तकात केली आहे. तसेच, आपल्याकडे त्यांची प्रतिकृति आहे हे मान्य केले आहे.

1907 सालच्या मॉडर्न रिव्यूच्या अंकात, सताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांचा फोटो छापला आहे.

भारतात 1857 ते 1893 या दरम्यान डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट सारख्या उच्चपदांवर काम केलेल्या, तसेच इतिहासाचे अभ्यासकर असणाऱ्या एच. बेवरीज या इंग्रज अधिकाऱ्याकडून 1921 साली केंब्रिज विद्यापिठाकडून छापलेल्या लेखात, विक्टोरिया अॅड अल्बर्ट म्युझीअम यांच्याकडे असणारी वाघनखे ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांची प्रतिकृति आहेत'', असे नमूद.

सातारा छत्रपतींना भेट देणाऱ्या अनेक उच्च पदस्थ इंग्रज व भारतीय अधिकारी यांनी महाराजांची वाघनखे साताऱ्यात पाहिल्याची नोंद.

छत्रपती शिवाजी महाराजांची अस्सल वाघनखे साताऱ्यातून बाहेर गेल्याची किंवा कोणाला भेट दिल्याची कोणताही पुरावा नाही.

 जगभरातील अनेक संग्रहालयात शिवाजी महाराजांच्या वाघनखांच्या प्रतिकृती उपलब्ध.

लंडनहून आणली जाणारी वाघनखं ठेवण्यासाठी एका कोल्हापुरात 7 कोटी रुपये खर्च करून स्ट्राँग रूम बांधली जात आहे. जर ही वाघ नखे छत्रपति शिवाजी महाराज यांची नसताना सरकार इतका पैसा का खर्च करत आहेत हा सवाल आहे.