मुंबई : महाशिवरात्रीनिमित्त विविध ठिकाणी असणाऱ्या शिवमंदिरांमध्ये आज उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. साऱ्या देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच महाराष्ट्रातही याची सुरेख झलक पाहायला मिळत आहे. देशात विविध ठिकाणी असणाऱ्या ज्योतिर्लिंग स्थळांवर भाविकांनी गर्दी केली आहे. महाराष्ट्रात असणाऱ्या ज्योतिर्लिंग ठिकाणांवरही भाविकांनी महादेवाचरणी नतमस्तक होण्यासाठी मंदिरांची वाट धरली आहे.
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर इथे मोठ्या उत्साहात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जात आहे. गुरुवारी रात्री शासकीय महापूजा झाल्यानंतर येथे महाशिवरात्री दर्शनाला सुरुवात झाली. रात्रीपासूनच शिवभक्तांनी भोळ्या सांबाच्या दर्शनासाठी इथे भल्यामोठ्या रांगा लावल्या होत्या. हर हर महादेवचा जयघोष करत, भाविक शंकराचं दर्शन घेत आहेत. आबालवृद्ध, महिला सारेच दर्शनासाठी जमले आहेत.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या त्र्यंबकेश्वर येथेही भाविकांचा ओघ पाहायला मिळत आहे. महाशिवरात्रीनिमित्त इथं देश-विदेशातून भाविक दर्शन, पूजा, अभिषेक करण्यासाठी हजेरी लावतात. रात्रीपासूनच नाशिकसह राज्यातून भाविक त्रंबकेश्वरमध्ये दाखल झाले आहेत. पहाटे ४ वाजल्यापासून मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं.
लागून सुट्या आल्यानं भाविक भक्तांची मोठी गर्दी याठिकाणी झाली. चेंगराचेंगरी सारख्या घटना घडू नये यासाठी विश्वस्त मंडळ, पुरोहित संघ आणि स्थानिक प्रशासनानं गाभारा दर्शन बंद केल्यानं भाविकांना दर्शन घेणं सुलभ होत आहे.
असंच काहीसं चित्र औंढा नागनाथ येथेही पाहायला मिळत आहे. शासकीय पूजेनंतर औंढा नागनाथच दर्शन घेण्याचा पहिला मान हिंगोली जिल्ह्यातील पान कण्हेरगावचे भाविक शिवराज रमेशअप्पा आकमार यांना मिळाला आहे. हिंगोली खासदार हेमंत पाटील आणि आमदार संतोष बांगर यांनी ही औंढा नागनाथला अभिषेक घालून दर्शन घेतलं. देवस्थानच्या वतीने शुद्ध पाणी आणि महाप्रसादाची भाविकांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे.
Maharashtra: Devotees throng Babulnath Temple in Mumbai to offer prayers on #MahaShivaratri. pic.twitter.com/jJUne8VQJH
— ANI (@ANI) February 20, 2020
पाहा : शंभो शंकरा! देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह
मुंबईतही.... बम भोलेचा नाद....
मुंबईच्या बाबुलनाथ मंदिरातही महाशिवरात्रीचा उत्साह दिसून येत आहे. महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करण्यासाठी, दर्शनासाठी रात्रीपासून भाविकांनी गर्दी केली आहे. तर, अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात महाशिवरात्रीच्या दिवशी भक्तांना गाभाऱ्यात प्रवेश बंद ठेवण्यात येणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन आणि विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला आहे.