जून महिन्यात दडी मारुन बसेलेल्या पावसाने आता जोरदार हजेरी लावली आहे. पुणे,नाशिक, सातारा, सांगलीसह वसई , ठाणे आणि पालघर येथील धरणक्षेत्रात मुसळधार पावासाला सुरुवात होत आहे, तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात शेतकऱ्यांची पेरणीच्या कामाला लगबग सुरु झाली आहे. ठिकठिकाणी नदी नाले दुथडी भरुन वाहण्यास सुरुवात झाली असून नदीचं पात्र सोडून पूरस्थिती निर्माण झाली आहे.अशातच आता डोळ्यांचं पारणं फेडणारा सावित्री नदीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
कोकण म्हटलं की आठवतं ते नारळी सुपारीच्या बागा, तांबडी माती आणि अथांग निळाशार समुद्र. निसर्ग सौंदर्य पहावं तर ते कोकणातंच, असं कायमच म्हटलं जातं. म्हणूनच की काय 'येवा कोकण आपलाच असा'. असं म्हणत कोकणकर चाकरमान्यांचं कायमच स्वागत करतात. हवेत परसलेला गारवा, चुलीच्या सरपणाचा धूर,घावणे आणि कोरा चहा या स्वर्गासुखाचा अनुभव घ्यायचा असेल तर, कोकणात एकदा तरी यावच. पावसाळ्यात उधाणलेला समुद्र अनुभवण्यासाठी पर्यटकांची पावळ्यात गर्दी असते. असं असलं तरी कोकणातील पावसात ओसंडून वाहणाऱ्या नद्या खाड्यांचं दृष्यं मनाला तितकंच मोहून घेतं. हे सांगण्याचं कारण म्हणजे सध्या सोशलमीडियावर महाडच्या सावित्री नदीच्या व्हिडीओने अनेकांना भुरळ घातली आहे.
महाडच्या 'देवळे' गावात पावसाचा जोर वाढल्यामुळे सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. लाल, तांबडी माती, हिरवाईने नटलेलं नदीचं खोरं, हिरवा शालू पांघरलेला सह्याद्री, ढगांनी आकाशात केलेली गर्दी ,आणि धुक्यात हरवून गेलेलं देवळे गाव. ड्रोनच्या माध्यमातून काढलेल्या या व्हिडीतून नदीचं विलोभनीयं सौंदर्य पाहून मन भारावून जातं.सावित्रीच्या या सौंदर्याला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली.