मुंबई : गेल्या आठवड्यामध्ये महाडमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातलं होतं. या मुसळधार पावसाने पूरपरिस्थिती निर्माण केली होती. यानंतर इथल्या नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. तर आता महाडच्या नागरिकांसमोर साथरोगाचं संकट उभं असलेलं दिसतंय. पूरानंतर इथल्या नागरिकांमध्ये लेप्टोची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
मुसळधार पावसाने आलेल्या पूरानंतर 15 जणांना लेप्टोस्पायरोसिसची लागण झाली आहे. इतकंच नाही तर 3 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे आता पूरग्रस्त भागातील नागरिकांनी तातडीने आरोग्य तपासणी करून घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
21 ते 23 जुलै या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड आणि पोलादपूर परिसराला महापूराचा तडाखा बसला. पूरानंतर महाड परिसरात चिखल आणि घाणीचे साम्राज्य पसरले होते. चिखलाचा एक ते दीड फूटांचा थर जमा झाला होता. धान्य कुजल्यामुळे दुर्गंधीही पसरली होती. पूरामुळे शेकडो जनावरेही मृत होऊन पडली होती. त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात होती.
नागरिकांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेता महाड इथल्या 11 ठिकाणी तर पोलादपूरमध्ये दोन ठिकाणी आरोग्य तपासणीचं काम सुरु करण्यात आलंय. या ठिकाणी डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसीस, काविळ तसंच कोरोना तसंच इतर आजारांची तपासणी केली जात आहे. यासाठी ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पनवेल, पुणे महानगर पालिकांची आणि रायगड जिल्ह्याची आरोग्य पथकं काम करत आहेत.
सध्या आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या असून जिल्हा प्रशासनाने आरोग्य तपासणीसाठी नागरिकांनी पुढे येण्याचं आवाहनंही केलंय. पंचनामे करणाऱ्या पथकांसोबत ओआरएसची तीन पाकिटे आणि डॉक्सीसायक्लीन २ गोळ्यांचे वाटप केलं जातंय. जखम झालेल्या नागरिकांसाठी टिटॅनसच्या लसीही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
सर्व प्रकारची औषधं महाड आणि पोलादपूर रुग्णालयांना उपलब्ध करून दिली आहेत. दरम्यान जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या म्हणण्याप्रमाणे, नागरीकांनी निःसंकोचपणे आरोग्य तपासणीसाठी समोर यावं. रूग्णांनी गृहविलगीकरणातच उपचार केले जातील. सर्व प्रकारची औषधे घरीच उपलब्ध करून दिली जातील.