महाड प्राध्यापक राडा : प्राचार्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप, कामबंद आंदोलन

महाडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात वादाची मालिका सुरुच आहे.  

Updated: Jan 25, 2020, 05:06 PM IST
महाड प्राध्यापक राडा : प्राचार्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप, कामबंद आंदोलन title=
संग्रहित छाया

रायगड : महाडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात वादाची मालिका सुरुच आहे. प्राचार्यपदावरून प्राध्यापकांच्या दोन गटात राडा झाला असतानाच मुंबई विद्यापीठाने नेमलेले प्राचार्य डॉ. प्रकाश कडलक यांना मारहाणीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप केला आहे. महाविद्यालयातील प्राध्यापकांनी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. 

आंबेडकर महाविद्यालयाची तोडफोड

डॉ. कडलक यांच्या विरोधातील मारहाणीचा गुन्हा मागे घ्यावा तसेच कायमस्वरूपी प्रशासक नियुक्त केला जावा, अशी मागणी केली आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आंबेडकर महाविद्यालयात प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.       

नवनिर्वाचित प्राचार्य डॉ. कडलक यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर हे कामबंदचे पाऊल उचलेल्याचे सांगण्यात आले आहे. गुन्हा मागे घेवून कायमस्वरूपी प्रशासक नियुक्त होईपर्यंत महाविद्यालयाचे कामकाज बंद ठेवण्याचा निर्धार आंदोलक कर्मचारी आणि प्राध्यापकांनी ठेवला आहे.

दरम्यान, या आंदोलनाचा फटका विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता आहे. परीक्षेच्या तोंडावर हे आंदोलन सुरु झाल्याने सुमारे चार हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.