या जिल्ह्यात अवकाळी पाऊसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

राज्यात येत्या काही दिवसांमध्ये अवकाळी पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.  

Updated: Feb 10, 2022, 07:43 PM IST
या जिल्ह्यात अवकाळी पाऊसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज  title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : शेतकऱ्यांसाठी काहीशी चिंताजनक बातमी आहे. राज्यात येत्या काही दिवसांमध्ये अवकाळी पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. हवामान खात्याच्या या अंदाजामुळे शेतातील पीकं सांभाळायची कशी, असा प्रश्नही शेतकऱ्यांसमोर आवासून उभा राहिला आहे. (maharashta rain update light rainfall in vidarbha district Weather department forecast)

हवामान खात्याने विदर्भातील भंडारा जिल्ह्यात येत्या 2 दिवसांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच बुधवारी तुमसर इथंही पाऊस पडला. त्यामुळे शेतकरी आणखी हवालदिल झाला आहे.  

अवकाळी पावसाचं सावट

मध्य भारतातील काही ठिकाणी कमी  दाबाचा पट्टा तयार झालाय. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पूर्व विदर्भात अवकाळी पावसाचा धोका उद्भवला आहे. शुक्रवारी 11 फेब्रुवारीला  साकोली, लाखांदूर, लाखनी आणि तुमसर या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे याच भागामध्ये अधिक पाऊस होण्याची भिती आहे.  

शेतकरी हवालदिल

शेतकऱ्याला कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकटाचा सामना करावा लागतो. सरकारी अनास्था आणि निसर्गाचा बेभरोशीपणा यामुळे शेतकऱ्याची नेहमीच कोंडी होत आली आहे. त्यात आता या अवकाळीच्या अंदाजामुळे बळीराजाची चिंता पुन्हा वाढली आहे.