मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाकरिता निवडणूक आयोगाने मतदारांसाठी नवीन रंगीत ओळखपत्र (व्होटर आयडी कार्ड) वाटप करण्यास सुरूवात केली आहे. नव्याने ओळखपत्राची मागणी केलेल्या राज्यातील सुमारे ४६ लाख मतदारांना हे नवीन ओळखपत्र मिळणार असून अर्ध्याहून अधिक मतदारांना ओळखपत्राचे घरपोच वाटप झाले आहे. रंगीत पीव्हीसी कार्डमध्ये बारकोडचा समावेश असणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मोहीमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नव्याने ओळखपत्राची मागणी केलेल्या मतदारांना टप्प्याटप्प्याने वितरण ओळखपत्राचे होणार आहे. मतदानासाठी ईपिक कार्डाशिवाय आणखीही ११ दस्तावेज मतदारांना द्यावे लागणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. ऊर्वरित ओळखपत्रे निवडणूक यंत्रणेमार्फत देण्याचे विशेष प्रयत्न केले जात आहेत.
प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी वैध मतदार छायाचित्र (Electoral Photo ID Card –ईपिक आयडी) असणे आवश्यक आहे. यासाठी भारतातील निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदारांना ओळखपत्र दिले आहे. यापूर्वी संगणकावर मुद्रित केलेले कृष्णधवल ओळखपत्र देण्यात येत होते. परंतु आता आकर्षक असे, रंगीत पॉलिमेरायझिंग विनाइल क्लोराईड (पीव्हीसी) ओळखपत्र देण्यात येणार आहे. ज्या नागरिकांकडे असे ओळखपत्र नसेल त्यांनी अर्ज केल्यानंतर नवीन ओळखपत्र मिळणार ज्यांनी नवी ओळखपत्रासाठी अर्ज केला आहे. त्या मतदारांना केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (बीएलओ) मतदारांच्या घरी जाऊन ओळखपत्र देण्यात येणार अथवा संबंधित कार्यालयात हे ओळखपत्र देण्यात येईल. मतदाराच्या नावात, पत्त्त्यात, लग्नानंतरच्या नावात बदल आदी कारणांमुळे नवीन ओळखपत्रासाठी अर्ज करता येईल. अर्ज केलेल्या नागरिकांना नवीन ओळखपत्र देण्यात येणार आहे.
यावर्षी आतापर्यंत सुमारे ४६ लाख मतदारांसाठी नवीन ओळखपत्र तयार करून वाटपासाठी वितरित करण्यात आले आहे. नवीन ओळखपत्रासाठी मागणी केलेल्या अर्जातील एकूण ९८ टक्के मतदारांना ओळखपत्र देण्यात आली आहेत. २०१४ मध्ये टक्केवारी ९४ इतकी होती. या ओळखपत्रावर मतदाराचे नाव, छायाचित्र, जन्मतारीख, पत्ता, लिंग आणि मतदाराचा विशिष्ट ओळख क्रमांक आदी माहिती या ओळखपत्रावर असणार आहे. त्याचबरोबर बारकोड असल्यामुळे बनावट ओळखपत्राला आळा बसणार आहे. हे ओळखपत्र पिव्हिसीपासून तयार केले असले तरी ते स्मार्ट कार्ड नाही.