शाब्बास रे गड्यांनो! कोल्हापूरमध्ये सर्वाधिक मतदान

जागृत मतदारांनी लोकशाहीच्या उत्सवात मोठ्या औत्सुक्याने सहभाग घेतला 

Updated: Oct 21, 2019, 10:10 PM IST
शाब्बास रे गड्यांनो! कोल्हापूरमध्ये सर्वाधिक मतदान

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. संपूर्ण मतदान प्रक्रियेत महाराष्ट्रातील विविध मतदार संघांमध्ये मतदारांनी आपलं मत नोंदवलं. सध्याच्या घडीला समोर आलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात ६०.४६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. यामध्ये बाजी मारली ती म्हणजे कोल्हापूरकरांनी. सायंकाळी सहा वाजेपर्यंत हाती आलेल्या प्राथमिक आकडेवारीपनुसार कोल्हापूरात तब्बल ७४ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. त्यामागोमाग सिंधुदूर्गात ६०. ८३ टक्के इतक्या मतदानाची नोंद करण्यात आली. 

हाती आलेल्या प्राथमिक माहितीप्रमाणे कोल्हापूरातील विधानसभा मतदारसंघानुसार आत्तापर्यंत झालेलं सरासरी मतदान खालीलप्रमाणे... 

चंदगड विधानसभा 69 %
राधानगरी विधानसभा 76%
कागल विधानसभा - 82%
कोल्हापूर दक्षिण - 74%
करवीर विधानसभा - 83%
कोल्हापूर उत्तर विधानसभा 60%
शाहूवाडी विधानसभा 80%
हातकणंगले विधानसभा 72%
इचलकरंजी विधानसभा 68%
शिरोळ विधानसभा 72%
(हे आकडे प्राथमिक आहेत.)

मतदान प्रक्रियेच्या दिवसावर पावसाचं सावट असतानाही कोल्हापूरकरांनी या लोकशाहीचा जागर मोठ्या उत्साहात पार पाडल्याचं पाहायला मिळालं. तर इथे मुंबईत मात्र मतदानाचा आकडा घसरल्याचं लक्षाता आलं. प्राथमिक अंदाजानुसार मुंबईत अवघं ५० टक्के मतदानाची नोंद झाली. 

विविध क्षेत्रातील दिग्गजांनी मतदानाचा हक्क बजावत चाहते आणि समर्थकांना मतदान करण्याचं आवाहन केलं. पण, यामध्ये बऱ्याच ठिकाणी मतदानाचा आकडा घसरताना दिसला. २०१४ मधील निवडणुकांच्या तुलनेत काही मतदारसंघांमध्येही ही आकडेवारी घसरल्याचं लक्षात आलं आहे.