मुख्यमंत्र्यांच्या काकू विजयी जोरगेवार यांच्या भेटीला

शोभाताई यांनी जोरगेवार यांना विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून तिकीट मिळवण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले होते

Updated: Oct 25, 2019, 05:27 PM IST
मुख्यमंत्र्यांच्या काकू विजयी जोरगेवार यांच्या भेटीला title=

चंद्रपूर : विधानसभा निवडणूक २०१९ चा निकाल झाल्यानंतर आता गणितं सुरू झालीत ती सत्तास्थापनेची... राज्यात सत्तास्थापनेसाठी राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाकडून अपक्षांची जुळवा-जुळवही सुरू झालीय. शुक्रवारी, चंद्रपूर मतदारसंघातून निवडून आलेले किशोर जोरगेवार यांच्या भेटीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू अर्थात शोभाताई फडणवीस पोहचल्या. विजयासाठी जोरगेवार यांची भेट घेतल्याचं यावेळी शोभाताईंनी म्हटलं. 


शोभाताई फडणवीस  आणि किशोर जोरगेवार

उल्लेखनीय म्हणजे, शोभाताई यांनी जोरगेवार यांना विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून तिकीट मिळवण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले होते. परंतु, ते काही शक्य झालं नाही. या मतदारसंघात भाजपाकडून नानाजी शामकुळे, काँग्रेसकडून महेश मेंढे आणि वंचित आघाडीकडून अनिरुद्ध वनकर हे मातब्बर जोरगेवार यांच्याविरुद्ध लढत होते. भाजपाकडून तिकीट मिळवण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर शोभाताई फडणवीस यांनी किशोर जोरगेवार यांच्या विजयासाठी आपल्या खास सहकाऱ्यांसह हितचिंतकांची फौज तयार केली होती. 

विधानसभा निवडणूक २०१९ च्या निकालात महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष भाजपा १०५, शिवसेनेला ५६, राष्ट्रवादीला ५४ आणि काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या आहेत. तर बहुजन विकास आघाडी- ३, एमआयएम- २, समाजवादी पार्टी- २, प्रहार जनशक्ती पार्टी- २, माकप- १, जनसुराज्य शक्ती- १, क्रांतिकारी शेतकरी पार्टी- १, महाराष्ट्र नवनिर्माण सेना- १, राष्ट्रीय समाज पक्ष- १, स्वाभिमानी पक्ष- १ आणि अपक्ष- १३ अशा इतर जागा निवडून आल्या आहेत.