'50 खोके एकदम ओके' ही घोषणा सर्वात आधी कोणी दिली? ती सुचली कशी? जाणून घ्या रंजक किस्सा

Who Gave '50 Khoke Ekdam Ok' Slogan: मागील अडीच वर्षांमध्ये तुम्ही अनेकदा महाराष्ट्राच्या राजाकारणामध्ये '50 खोके, एकदम ओके' ही घोषणा ऐकली असणार. मात्र ही घोषणा सर्वात आधी कोणी दिली? कोणाच्या डोक्यातून या घोषणेची कल्पना आली तुम्हाला माहितीये का?

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 28, 2024, 02:52 PM IST
'50 खोके एकदम ओके' ही घोषणा सर्वात आधी कोणी दिली? ती सुचली कशी? जाणून घ्या रंजक किस्सा title=
मागील अडीच वर्षांपासून ही घोषणा चांगलीच चर्चेत आहे (प्रातिनिधिक फोटो)

Who Gave '50 Khoke Ekdam Ok' Slogan: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात आचारसंहितेमुळे ठिकाठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. या नाकाबंदीदरम्यान मागील आठवड्याभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये 50 कोटींहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे. यामुळेच आता पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. खेड-शिवापूर टोल नाक्यावर कारमध्ये सापडलेले 5 कोटी रुपयांनंतर जळगावमधील एरंडोलमध्येही एक कोटी 45 लाख रुपयांची कॅश 22 ऑक्टोबरच्या रात्री आढळून आली. शरद पवारांच्या काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी यासंदर्भात सोशल मीडियावरुन थेट सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधताना '50 खोके, एकदम ओके' हा हॅशटॅग वापरला. सदर छापेमारी आणि जागोजागी सापडत असलेल्या रोख रक्कमेमुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणामध्ये खोक्यांची जोरदार चर्चा आहे. खरं तर मागील अडीच वर्षांमध्ये राज्याच्या राजकारणामध्ये '50 खोके एकदम ओके' घोषणा जबरदस्त गाजली. मात्र ही घोषणा नेमकी आली कुठून? ती कोणी आणि कशी तयार केली? याचसंदर्भात नुकताच एका मुलाखतीत खुलासा झाला आहे.

'50 खोके एकदम ओके' प्रकार आहे तरी काय?

विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली 2022 मध्ये शिवसेनेत उभी फूट पडली त्यानंतरपासून '50 खोके एकदम ओके' ही घोषणा राज्याच्या राजकारणात कायमच चर्चेत राहिली. खरं तर अगदी आठवड्याभरापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने '50 खोके एकदम ओके' अशी घोषणा देणं हा गुन्हा नसल्याचा निकाल दिला आहे. बंडखोरीसाठी आमदारांना आर्थिक रसद पुरवण्यात आल्याचा आरोप राज्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या पक्षाने भारतीय जनता पार्टीबरोबर सत्ता स्थापन केल्यानंतर विरोधकांकडून करण्यात आला. अगदी महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर झालेल्या पहिल्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळी महाविकास आघाडीमधील आमदार '50 खोके एकदम ओके'चे बॅनर्स पकडून मंत्रालयाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करत शिवसेनेमध्ये फूट पाडून सत्ता स्थापन झाल्याचा विरोध करत होते. 

वाढत गेला या घोषणेचा वापर

सत्तासंघर्षानंतर शिवसेनेवरील तसेच धुनष्याबाण चिन्हावरील दावेदारी आणि इतर न्यायालयीन लढाईदरम्यान दिवसोंदिवस या घोषणाचे वापर आणि त्यावरुन होणारे आरोप प्रत्यारोप वाढतच गेलं. काही काळाने'50 खोके एकदम ओके' ही घोषणा स्वत: उद्धव ठाकरे यांनी अनेक पत्रकार परिषदांमध्ये, सभांमध्ये वापरत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. याचबरोबर महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी वेळोवेळी '50 खोके एकदम ओके'चा उल्लेख या ना त्या माध्यमातून करत सत्ताधाऱ्यांवर टीका केल्याचं पाहायला मिळालं. पण ही घोषणा नेमकी जन्माला कशी आली? या घोषणेचे निर्माता कोण? याबद्दल नुकताच 'मित्र म्हणे' या पॉडकास्टमध्ये एका आमदाराने खुलासा केला आहे.

नक्की वाचा >> ना महाविकास आघाडी ना महायुती... अबकी बार अपक्ष सरकार? राज्यात 1995 च्या इतिहासाची पुनरावृत्ती?

या व्यक्तीनेच दिला '50 खोके एकदम ओके' घोषणेला जन्म; कशी सुचली घोषणा हे ही सांगितलं

'50 खोके एकदम ओके' ही घोषणा काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांच्या डोक्यातील कल्पना आहे. सौमित्र पोटे यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये कैलास गोरंट्याल यांनी ही घोषणा आपल्याला शहाजी बापू पाटील यांच्या गाजलेल्या संवादाबद्दल विचार करताना सुचल्याचं सांगितलं आहे. या मुलाखतीदरम्यान, कैलास गोरंट्याल यांना, "50 खोक्यांची ऑफर तुम्हाला आली असणार. त्यानंतर तुम्ही '50 खोके एकदम ओके'मुळे स्टार झालात. हा किस्सा काय होता? ती टॅगलाइन कशी काय आली?" असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना, "औरंगाबादचे एक वादग्रस्त मंत्री कॅबिनेट मंत्री झाले. त्यांचं एक कॉलेज आहे. ते कॉलेज मीच एकेकाळी विलसराव असताना मी त्यांना दिलं होतं. ते आता माझ्याविरोधात आहेत. त्यांचा एक शिक्षक आला होता. आलं तर कोणी आपण त्याला वेलकम करतो. बसा चहा घ्या वगैरे झालं. एकटा आला होता. मला म्हणाला हे सर्व लोक गुवहाटीला गेले. मी म्हटलं हो करेक्ट. मी म्हटलं तुम्ही कशासाठी आलात? म्हटला 50 खोक्यांची ऑफर आहे तुमच्यासाठी!मी हे स्पष्टच सांगतोय इथे. या आरोपाचं खंडन केलं तर मी त्या मास्तराचं नाव पण सांगू शकतो," असं कैलास गोरंट्याल यांनी सांगितलं.

नक्की वाचा >> ठाकरे-शिंदेंना 'तो' एकटाच नडणार? माघार घेण्यास नकार, अवघ्या 10 मिनिटात CM शिंदेंच्या घरुन...

"त्यानंतर मी मुंबईला गेलो तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांना सांगितलं की आपल्या मागे असं असं आहे. आपल्या लोकांना ऑफर देत आहेत, तुम्ही करा काहीतरी!त्याचवेळी त्या आमदाराचं काय झाडी, काय डोंगर एकदम ओके चर्चेत होतं. त्यावेळी मग माझ्या डोक्यात ते आलं. त्यावर मी तसा रिप्लाय दिला. 50 खोके, एकदम ओके! मग हा डायलॉग फेमस झाला एकदम," असंही कैलास गोरंट्याल यांनी ही मूळ घोषणा कशी सुचली याबद्दल सांगितलं. रोहित पवारांनी नुकतीच ही घोषणा हॅशटॅग म्हणून वापरली खाली पाहा त्यांची पोस्ट...

शेरोशायरीची आवड

आपल्याला शेरोशायरीची आवड असल्याचं कैलास गोरंट्याल यांनी या मुलाखतीत सांगितलं. "अविश्वास ठराव दाखल झाला होता. त्यावेळेस सर्व आमदार हजेरी देतात की तुम्ही कोणत्या बाजूने आहात. त्यावेळी माझ्याबरोबर जे काँग्रेसचे आमदार होते त्या सर्वांना माहिती आहे की मी शायर आहे. मी प्रत्येक वळेस शायरी करायचो. माझा 56 नंबर होता (समर्थक आमदार) मोजताना. मी जसा उभा राहिलो खालून आवाज आला शेर बोलो, शेर बोलो असा. तेव्हा मी म्हणालो होतो, ऐसे वैसे कैसे कैसे हो गए, कैसे वैसे ऐसे वैसे हो गए!" असंही कैलास गोरंट्याल आपल्या शेरोशायरीच्या आवडीबद्दल म्हणाले.  

नक्की वाचा >> पुतण्याविरुद्ध लढणाऱ्या संदीप देशपांडेंना राज ठाकरेंचा 5 शब्दांचा खास मेसेज! म्हणाले 'वरळीतून तुला...'

लवकरच  '50 खोके, एकदम ओके!' नावाचं नाटक

लवकरच ' 50 खोके, एकदम ओके!' नावाचं लोकनाट्य प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या लोकनाट्याचं लेखन-दिग्दर्शन जयवंत भालेकर यांनी के लं आहे. या नाटकामध्ये भालेकर स्वतः प्रमुख भूमिका साकारणार आहेत. संदेश बेंद्रेंनी या नाटकाचं नेपथ्य केलं असून पार्श्वसंगीताची जबाबादरी सत्यजित रानडे पेलली आहे. '50 खोके, एकदम ओके!' या नाटकातून सध्याच्या राजकीय, सामाजिक घडामोडींवर मिश्किल भाष्य करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. हे लोकनाट्य राजा, राणी, प्रधान अशा पारंपरिक पात्रांचा समावेश असलेलं मात्र मांडणी आताच्या काळची असणार असेल व बतावणीच्या माध्यमातून मांडलं जाईल.