‘मराठी नको’ अशी मुंबईतील गुजराती, जैनांच्या सर्व टॉवर्सची भूमिका असेल तर...; राऊत कडाडले

Sanjay Raut On Gujrati And Jains In Mumbai: "महाराष्ट्रातील ‘मराठी’ माणूस आज मराठी राहिलेला नाही. कुठे मराठा, कुठे ओबीसी, कुठे तो हिंदू झाला," असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 15, 2024, 08:00 AM IST
‘मराठी नको’ अशी मुंबईतील गुजराती, जैनांच्या सर्व टॉवर्सची भूमिका असेल तर...; राऊत कडाडले title=
संजय राऊतांनी साधला निशाणा

Sanjay Raut On Gujrati And Jains In Mumbai: मुंबईतील गिरगाव, परळ, शिवडी, लालबाग भागांत गुजराती, जैनांचे टॉवर्स उभे राहिले असून त्यांना मराठी नको आहे, असा घणाघात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. "मुंबईत मराठी माणसाकडे नक्की काय राहिले? मुंबईच्या जीवनाच्या कोणत्या एका क्षेत्रात जर महाराष्ट्राची म्हणजेच मराठी माणसाची कामगिरी किमान असेल तर ते क्षेत्र व्यापार-उद्योगाचे. मुंबईतील सार्वजनिक जीवनात इतर सर्व दृष्टींनी श्रेष्ठ दर्जाची कामगिरी बजावणारा महाराष्ट्र मुंबईतील व्यापार-उद्योगांत कमी ठरला म्हणून तो आपल्या घरातच उपरा ठरू पाहत आहे. केवळ या एकाच गोष्टीमुळे मुंबईवरचा महाराष्ट्राचा हक्क नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत," असा आरोप राऊत यांनी केला आहे.

महाराष्ट्राचा मोठा महसूलही गुजरातच्या तिजोरीत

"महाराष्ट्र हे सर्व आज थंडपणे पाहत आहे. मुंबईतील वृत्तपत्र व्यवसाय मराठी माणसांकडे होता. कोरोनानंतर वृत्तपत्र वाचकांत घट झाली. मराठी नाटक, मराठी सिनेमालाही बरे दिवस नाहीत. सांगलीपासून मुंबईपर्यंत ‘पुष्पा-2’ हा दक्षिणी चित्रपट पाहण्यासाठी तिकीट खिडकीवर झुंबड उडते. काही ठिकाणी ‘पुष्पा-2’च्या तिकिटांसाठी दंगली झाल्या, पण मराठी चित्रपटसृष्टीचे बरे चाललेले नाही. मुंबईतील प्रमुख सरकारी कार्यालये, उद्योग आधीच गुजरातला गेले. हिरे बाजार सुरतला गेला. त्यामुळे महाराष्ट्राचा मोठा महसूलही गुजरातच्या तिजोरीत गेला. हे सर्वच क्षेत्रांत वेगाने चालले आहे. तरीही मराठी राजकारण्यांची साधी पापणी फडफडताना दिसत नाही," असं राऊत 'सामना'मधील 'रोखठोक' सदरामध्ये म्हणाले आहेत.

हे सर्व टॉवर्स महाराष्ट्राच्या छाताडावर नाचताना दिसले

"मुंबईच्या बांधकाम व्यवसायात गुजरातच्या, हरयाणाच्या श्रीमंतांचा पैसा गुंतला आहे. अदानीपासून हरयाणाच्या सुमीत नरवरपर्यंत सगळे जण मुंबईच्या बांधकाम व्यवसायात आहेत व फडणवीसांचे सरकार त्यांना नियम मोडून मदत करते. या बांधकाम व्यवसायातील मोठा नफा भाजप नेत्यांच्या खिशात जातो. इतरही त्यात हात धुऊन घेतात. त्यामुळे सगळ्यांच्याच तोंडाला चिकटपट्ट्या लागल्यात. गिरगाव, परळ, शिवडी, लालबाग भागांत गुजराती, जैनांचे टॉवर्स उभे राहिले. यातील मतदान महाराष्ट्राच्या विरोधात होत आहे. आश्चर्य असे की, “एक है तो सेफ है’’च्या घोषणा करणाऱ्यांचे हे टॉवर्स. या टॉवर्समध्ये मराठी माणसाला जागा देण्यास त्यांचा विरोध, म्हणजे येथे मराठी माणूस त्यांच्यासाठी हिंदू नसतो. त्यांना मराठी माणसांचा पक्ष घेणारे शिवसेनेसारखे पक्ष नकोत. लोकसभा आणि विधानसभेत हे सर्व टॉवर्स महाराष्ट्राच्या छाताडावर नाचताना दिसले व ‘मराठी नको’ अशी या सर्व टॉवर्सची भूमिका असेल तर मराठी माणसाला एकजुटीने या टॉवर्सशी सामना करावा लागेल," असं राऊत म्हणालेत. 

"आता “मराठी बोलू नका’’ इथून सुरू झालेल्या धमक्या यापुढे..."

"महाराष्ट्रातील ‘मराठी’ माणूस आज मराठी राहिलेला नाही. कुठे मराठा, कुठे ओबीसी, कुठे तो हिंदू झाला. त्यामुळे मुंबई मराठी माणसाच्या हातून सटकताना दिसते. भाजपच्या व्यापारी वृत्तीने मुंबईचा घास गिळला. त्यामुळे आता फक्त मुंबईचा गुदमरलेला श्वास व तडफड दिसते. आता “मराठी बोलू नका’’ इथून सुरू झालेल्या धमक्या यापुढे “मराठी माणसाने येथून चालते व्हावे’’ इथपर्यंत जातील. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राला काय मिळाले? मुंबईवरचे हक्क गुजराती-मारवाड्यांना सहज दिले," असं राऊत यांनी म्हटलं आहे. "105 मराठी जनांनी मुंबईसह महाराष्ट्र निर्माण व्हावा म्हणून हौतात्म्य पत्करले. हुतात्मा स्मारकावरही ‘टॉवर्स’ उभे राहील काय?" असा सवाल राऊत यांनी विचारला आहे.