Supriya Sule vs Ajit Pawar: सिंचन घोटाळ्यावरुन सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अजित पवारांमध्ये (Ajit Pawar) जुंपली आहे. आर आर पाटील (RR Patil) यांनी कर नाहीतर डर कशाला या न्यायातून चौकशी लावली असेल असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. एका प्रकारे सिंचन घोटाळ्याच्या चौकशीचं सुप्रिया सुळेंनी समर्थन केलं आहे. झी २४तासच्या 'टू द पॉईंट' या विशेष कार्यक्रमात सुप्रिया सुळेंनी आपली भूमिका मांडली. यावर अजित पवारांनी सुप्रिया सुळे चुकीची माहिती देत असल्याचं म्हटलंय.
सिंचन घोटाळ्याच्या फाईलवर आर आर पाटील यांनी सही केल्याचा आरोप अजित पवारांनी केला होता. अजित पवारांनी केलेल्या या वक्तव्यावरुन रोज नवा आरोप होऊ लागला आहे. सिंचन घोटाळ्याशी अजित पवारांचा संबंध नव्हता तर अजित पवारांनी घाबरायचं कारण नव्हतं असं सुप्रिया सुळेंनी 'टू द पॉईंट' या मुलाखतीत म्हटलं.
या प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यशैलीवरही सुप्रिया सुळेंनी आरोप केले. मुख्यमंत्रिपदी असताना फडणवीसांनी चौकशीची फाईल अजित पवारांना दाखवली कशी असा सवाल सुप्रियांनी केला आहे.
सिंचन घोटाळ्याच्या चौकशीवरुन सुप्रिया सुळे काथ्याकुट करत असल्याचा टोला भाजप नेते प्रवीण दरेकरांनी केला आहे. सुप्रिया सुळेंनी याबाबत योग्य ठिकाणी तक्रार करावी असं आव्हानच दरेकरांनी दिलं आहे. स्वतः अजित पवारांनीही सुप्रिया सुळेंच्या या आरोपांना उत्तर दिलं आहे.
सुप्रिया सुळे चुकीचं सांगत असल्याचा अप्रत्यक्षपणं अजित पवारांनी सांगितलं आहे. सिंचन घोटाळ्याच्या चौकशीच्या फाईलवरील सहीचा मुद्दा अजित पवारांनी काढला खरा... पण आता त्यावरुन वेगवेगळे आरोप होऊ लागलेत. या आरोपांना उत्तर देताना अजित पवारांची दमछाक होणार हे आता स्पष्टपणं दिसू लागलंय.