पुणे: आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलकांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंद आंदोलनाचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहेत. यापूर्वी मराठा क्रांती मोर्चाकडून राज्यभरात टप्प्याटप्प्याने ठोक मोर्चाचे आणि बंद आंदोलन करण्यात आले होते. आंदोलकांनी समजूत घालण्यासाठी आलेल्या नेत्यांसमोर आक्रमक पवित्रा घेतला होता.
महाराष्ट्र बंद LIVE : मुंबई-गोवा, मुंबई-आग्रा महामार्ग रोखला... आंदोलक रस्त्यावर
त्यानंतर आज आंदोलकांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे आंदोलनाची धग वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याशिवाय, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील उद्धव ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवरील पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. त्यामुळे आता हे दोन्ही नेते आंदोलकांना जाऊन त्यांच्याशी चर्चा करणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे काँग्रेस नेते अमित देशमुख लातूरमध्ये थेट मराठा आंदोलकांमध्ये सामील झाले. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच मराठा क्रांती मोर्चाच्या आरक्षणाच्या मागणीला समर्थन दिले आहे.
पालघर आणि नंदुरबारमधील सकल मराठा समाजाचा बंद मागे
दरम्यान, आज सकाळपासून राज्यभरात ठिकठिकाणी महाराष्ट्र बंद आंदोलनाचे पडसाद उमटत आहेत. आंदोलकांनी मुंबई-गोवा, मुंबई-आग्रा हे दोन महामार्ग रोखून धरले. तर हिंगोलीत आंदोलकांनी एक स्कूल व्हॅन जाळल्याची घटना घडली. हा अपवाद वगळता अन्य ठिकाणी मोर्चेकरी ठिय्या आंदोलन करुन रस्ते वाहतूक बंद करताना दिसत आहेत. मुंबईत अजूनपर्यंत या आंदोलनाचा फारसा प्रभाव जाणवला नाही. मुंबईतील रेल्वे आणि बेस्ट सेवा सुरळीतपणे सुरु आहेत. मात्र, पुण्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.