Maharashtra Budget Session: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या विधानामुळे गदारोळ सुरु आहे. संजय राऊत यांनी महाराष्ट्र विधिमंडळाला (Maharashtra Legislative) चोरमंडळ म्हटलं असल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. संजय राऊताच्या विधानावर सत्ताधारी आक्रमक झाले असून हक्कभंग प्रस्तावच मांडला आहे. दरम्यान भरत गोगावले (Bharat Gogavle) यांनी संजय राऊतांवर टीका करताना 'भाडखाऊ' शब्द वापरल्याने एकच गदारोळ सुरु झाला. यानंतर ठाकरे गटाच्या आमदारांनी हा शब्द मागे घेण्याची मागणी केली. सत्ताधारी आणि विरोधकांच्या गदारोळात सभागृह अनेक वेळा तहकूब करण्यात आलं.
"विधिमंडळमध्ये बनावट शिवसेना आहे. हे बनावट चोरांचं मंडळ आहे. त्यांनी आम्हाला पदावरून काढले तरी आम्ही पक्ष सोडणार नाही. कारण अशी अनेक पदं आम्हाला पक्षाने , बाळासाहेब ठाकरे यांनी दिली. ती पदे आम्ही अशी ओवाळून टाकतो. पदं गेली तर परत येतील, पण आम्हाला आमचा पक्ष महत्त्वाचा आहे," असं संजय राऊत यांनी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं.
संजय राऊतांच्या वादग्रस्त वक्तव्यानं पेटवलं रान! विधिमंडळात भाजप-शिंदे गट आक्रमक
संजय राऊत यांच्या विधानावर विधानसभेत बोलताना भरत गोगावले म्हणाले की "प्रत्येक गोष्टीला एक प्रमाण असतं. प्रमाणाच्या बाहेर गेल्यानंतर अती तिथे माती हे ठरलेलं आहे. हक्कभंग व्हायलाच पाहिजे. लोकांच्या भावना भडकत आहेत. बाहेर प्रक्षोभक वातावरण होऊ द्यायचं नसेल तर कारवाई झालीच पाहिजे. या माणसाला अधिकार कोणी दिला? हे स्वत:ला इतके शहाणे समजत आहेत? भाड खायला पाहिजे पण इतका भाडखाऊपणा नको. राऊत यांच्यावर कारवाई करा".
"चोरांना पकडण्यासाठी कायदे करणारं हे मंडळ आहे. पण त्याला चोरमंडळ म्हटलं जात आहे. या माध्यमातून संपूर्ण देशभरात महाराष्ट्राचा अपमान केला जात असून हा महाराष्ट्रद्रोह आहे. यांना कोणी परवानगी दिली आहे. महाराष्ट्राबद्दल तुमच्या मनात हीच भावना असेल तर तशी भूमिका स्पष्ट करा. या सदनात कोणी दाऊद आहे का? येथील सदस्यांना तुम्ही चोर म्हणत आता. त्यामुळे कारवाई झाली पाहिजे. आम्हाला बोटचेपी भूमिका अपेक्षित नाही," असं सभागृहात आशिष शेलार यांनी सांगितलं.
"आपण सर्वजण आपापल्या मतदारसंघांचं प्रतिनिधित्व करत आहोत. कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला, नागरिकाला अशाप्रकारे चोरमंडळ म्हणण्याचा अधिकार नाही. टीव्हीला एका व्यक्तीने असं विधान केल्याचं बातमी आली आहे. आशिष शेलार यांच्या मताशी मी सहमत आहे. पक्षीय गोष्टीला बाजूला ठेवून याकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे. प्रत्येकाने आपलं मत मांडलं पाहिजे, पण काहीही बोलू नये. आता त्या बातमीत तथ्य आहे का तेदेखील पडताळलं पाहिजे. मी त्यांची बाजू घेत नाही. पण ते खरंच बोललेत का याची शहानिशा झाली पाहिजे. बोलले असतील तर योग्य ती कारवाई केली पाहिजे. त्यांना योग्य संदेश दिला पाहिजे," असं स्पष्ट मत विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माडलं. यावर अतुल भातखळकर यांनी आपल्याकडे झी 24 तासची क्लिप असून संजय राऊत असंच बोलले असल्याचं सांगितलं.