चिंता वाढवणारी बातमी, राज्यात कोरोना मृत्यूसंख्येत अद्याप घट नाहीच!

राज्यातल्या मृत्यूसंख्येत घट नाहीच. काल दिवसभरात 154 रूग्णांचा मृत्यू झाला असून एकट्या साताऱ्यात 24 तासांत 37 मृत्यू झाला आहे.

Updated: Aug 20, 2021, 09:02 AM IST
चिंता वाढवणारी बातमी, राज्यात कोरोना मृत्यूसंख्येत अद्याप घट नाहीच! title=
संग्रहित छाया

मुंबई : Maharashtra corona death : सध्या कोरोनाचा धोका कमी झाल्याचे वाटत असले तरी चिंता करणारी बातमी हाती आली आहे. राज्यात गुरुवारी दिवसभरात 5225 नवीन कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. तर राज्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यू संख्येत (corona death) वाढ झाली आहे.  काल दिवसभरात 154 रूग्णांचा मृत्यू झाला असून एकट्या साताऱ्यात 24 तासांत 37 मृत्यू झाला आहे.त्यामुळे कोविडचे नियम कटाक्षाने पाळण्यात यावेत, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कुठेही गर्दी करु नका, मास्क वापरा, हात स्वच्छ साबणाने धुवा आणि एकमेकांमधील अंतर राखा, असे आवाहन केले आहे.(Coronavirus Death in Maharashtra)

राज्यात एकणून 62 लाख 14 हजार 921 कोरोना रुग्ण उपचारानंतर ठणठणीत होऊन घरी परतले आहेत. मुंबईत पालिका हद्दीत काल 282 नवीन कोरोना बाधित आढळून आले आहेत. मुंबईतील कोरोना बाधितांचा आकडा हा 7 लाख 40 हजार 289 इतकी आहे. तर 24 तासात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात येत असताना कालचा आकडा चिंता वाढवणार आहे. तर ठाण्यातही 224 नवे रुग्ण आढळून आले आहेत. ठाणे पालिका क्षेत्रात 49, कल्याण-डोंबिवलीत 63, नवी मुंबई पालिका हद्दीत 62, मिरा-भाईंदरमध्ये 18, अंबरनाथमध्ये 8 तर बदलापूरमध्ये 9 आणि ठाणे ग्रामीणमद्ये 9 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता सातत्याने वर्तवली जात असतानाच मुंबईत पहिल्याच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत रुग्णवाढ आणि मृत्युदराचा आलेख घसरता दिसून आला तरी पुन्हा रुग्णवाढ होत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील रुग्णवाढ दराच्या (पॉझिटिव्हिटी रेट) टक्केवारीची तुलना केल्यास दुसऱ्या लाटेतील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे आढळून येत आहे. मात्र, धोका कायम असल्याचे दिसून येत आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून दररोज नवीन आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही घट झालेली आहे. सध्या 200च्या आसपास नवीन रुग्ण आढळत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले असले तरी कोरोनाचा धोका टळलेला नाही. याबाबत अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.