एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला मोठा निर्णय

ST employee salaries : एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी (Diwali) गोड होणार आहे.  

Updated: Oct 27, 2021, 06:49 AM IST
एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला मोठा निर्णय title=

मुंबई : ST employee salaries : एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी (Diwali) गोड होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठा निर्णय घेतल्याने एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीत दिलासा मिळाला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 112 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. (Maharashtra govt orders release of Rs. 112 crore to pay salaries of  ST employees)

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महाविकास आघाडी सरकार विविध उपाययोजना राबवित आहे. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून परिवहन महामंडळातील एसटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन देण्यासाठी विशेष बाब म्हणून 112 कोटींचा निधी तातडीने देण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली. याबाबतचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल दिले. त्यानुसार तातडीने निधी वितरीत करण्यात आला आहे.  

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोना संकट काळात एसटी कर्मचाऱ्यांनी चांगली सेवा बजावली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी महाविकास आघाडी सरकार ठामपणे उभे आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या परिवहन महामंडळाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. कोणत्याही कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत झाले पाहिजे, अशी या सरकारची भूमिका आहे. 

कोरोना संकटकाळात लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाल्याने एसटीच्या वाहतुकीवर परिणाम झाला. प्रवासी संख्या कमी झाली. त्यामुळे परिवहन महामंडळाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. परिणामी पगारासाठी निधीची कमतरता निर्माण झाली. या कठीण परिस्थितीचा विचार करता परिवहन महामंडळाला हा निधी तातडीने वितरीत करण्याचे निर्देश दिले आणि त्याची तात्काळ अंमलबजावणी झाली. या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.