धक्कादायक : शाळकरी मुलांमध्ये 'गँग ऑफ वासेपूर', भांडणात विद्यार्थ्याची हत्या

लहान मुलांमध्ये हिंसेचं प्रमाण वाढलं? खेळण्याच्या वादात एकाची हत्या

Updated: Oct 26, 2021, 08:36 PM IST
धक्कादायक : शाळकरी मुलांमध्ये 'गँग ऑफ वासेपूर', भांडणात विद्यार्थ्याची हत्या

कपील राऊत, झी मीडिया, ठाणे : कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरु झाले आहेत. राज्यात सध्या आठवी ते दहावीचे वर्ग भरत असून सहामाही परिक्षा सुरु आहेत. शाळा पुन्हा सुरु झाल्याने विद्यार्थ्यांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे. असं असताना ठाणे जिल्ह्यात मात्र एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातल्या एका शाळेतील दहावीच्या दोन गटात जबर मारामारी झाली. यात एका विद्यार्थ्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. खेळण्यावरुन विद्यार्थ्यांच्या दोन गटात वाद झाला आणि या वादाचं पर्यावसन मारामारीत झालं. शाळेजवळील प्रगती हॉस्पीटल इथल्या पाईलाईन ब्रिजवर दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. 

हा वाद इतका टोकाला गेला की तीन विद्यार्थ्यांनी एका पंधरा वर्षीय मुलाच्या छातीत सूरा खुपसला. तुषार साबळे असं या विद्यार्थ्याचं नाव असून रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तुषारचा मृत्यू झाला. याप्रकरणी तीन आरोपी विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.