बळीराजाचं पिवळं सोनं चकाकलं; सांगलीच्या बाजारात हळदीला मिळाला ऐतिहासिक दर

Maharashtra Farmers News: पिवळ्या धमक हळदीला सोनेरी दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. राजापुरी हळदीला मिळाला 41 हजार 101 रुपये ऐतिहासिक विक्रमी दर.   

मानसी क्षीरसागर | Updated: Mar 6, 2024, 11:32 AM IST
बळीराजाचं पिवळं सोनं चकाकलं; सांगलीच्या बाजारात हळदीला मिळाला ऐतिहासिक दर title=
maharashtra news Farmers happy over rise in turmeric price in sangali

Price Of Turmeric:  हळदीची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या सांगलीत हळदीला सोन्याचा भाव मिळाला आहे. सांगलीमध्ये हळदीला ऐतिहासिक असा विक्रम दर मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

बुधवारी सांगलीमध्ये हळदीला ऐतिहासिक असा विक्रमी दर मिळाला आहे.तब्बल 41 हजार 101 रुपये इतका दर राजापुरी हळदीला मिळाला आहे.सांगली बाजारपेठेतल्या आतापर्यंतच्या इतिहासातला हा सगळ्यात मोठा दर असल्याचं कृषी उत्पन्न बाजार समितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कर्नाटकच्या कोहळी येथील शेतकरी सायबान भूपती पुजारी यांच्या हळदीला हा विक्रमी दर मिळाला आहे.

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पार पडलेल्या सौद्यासाठी 12 हजार 900 क्विंटलला हळदीची आवक झाली होती. ज्यामध्ये पुजारी यांच्या राजापुरी हळदीला ऐतिहासिक उच्चांकी दर मिळाला आहे.सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या काही दिवसांपासून हळदीला सगळ्यात चांगला भाव मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपली हळद विक्रीसाठी आणावं असा आवाहन बाजार समितीकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून हळदीच्या दरांमध्ये चांगली वाढ होत आहे. सांगली बाजारपेठेत दररोज 15 ते 20 हजार राजापुरी हळदीच्या पोत्यांची आवक सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील कुल्लोळी येथील शेतकरी बसवराज भिमाप्पा दासनाळ यांनी विक्रीसाठी आणलेल्या हळदीला विक्रमी 32 हजार रुपयांचा दर मिळाला होता. त्यानंतर आजही पुजारी यांच्या हळदीला विक्रमी भाव मिळाला आहे. 

कापसाचे दर वधारल्याने बाजारात कापसाची आवक वाढली

मागील काही महिन्यापासून कापसाच्या दरात घसरण झाल्याने कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत पडले होते. वाशिम जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी दरवाढीच्या अपेक्षेने कापूस साठवूनही ठेवला आहे. आता कापसाच्या दरात काहीशी वाढ झाली आहे. सध्या कापसाचे दर जवळपास 8 हजार रुपये प्रती क्विंटलपर्यंत पोहोचल्याने कापूस साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाल्याने बाजारात कापसाची आवक वाढली आहे. मात्र शेतकऱ्यांना मागील वर्षी 10 ते 13 हजार रुपये प्रति क्विंटल दर होता त्याच दर मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

मावळात कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव

मावळ मध्ये गेली सहा सात दिवसापासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे आणि उन्हाची तीव्रता वाढत असल्याने रब्बी हंगामातील लागवड केलेल्या कांदा पिकावर याचा विपरीत परिणाम होत असल्याची चित्र पहावयास मिळत आहे. मावळ तालुक्यातील 188 हेक्टर वरील उन्हाळी कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. महागड्या औषधाची फवारणी करूनही करपा कमी होत नसल्याचे उत्पादनात घट होण्याची चिंता निर्माण झाली आहे.