महायुतीत अजित पवार एकटे? सुनेत्रा पवारांचा अर्ज भरताना भाजप-शिवसेनेचे नेते गैरहजर

Mahayuti Ajit Pawar : अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे.  सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामार्फत होताच पवारांच्या काटेवाडीत जल्लोष करत गुलालाची उधळण आणि फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली.

कृष्णात पाटील | Updated: Jun 13, 2024, 04:35 PM IST
महायुतीत अजित पवार एकटे? सुनेत्रा पवारांचा अर्ज भरताना भाजप-शिवसेनेचे नेते गैरहजर title=

Mahayuti Ajit Pawar : राज्यसभेवर सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून (Ajit Pawar Group) सुनेत्रा पवारांना (Sunetra Pawar) उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अर्ज भरताना राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते. दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती. तोपर्यंत इतर कुणीही अर्ज दाखल केला नाही, त्यामुळे सुनेत्रा पवारांची राज्यसभेवर (Rajyasabha) बिनविरोध निवड झाली आहे. 

अजित पवार एकटे पडले?
दरम्यान महायुतीत अजित पवार एकटे पडले आहेत का असा प्रश्न निर्माण झालाय. कारण सुनेत्रा पवार यांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भाजप आणि शिवसेना शिंदे पक्षाचा एकही नेता हजर नव्हता. तर केवळ राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचेच नेते यावेळी उपस्थित होते. विशेष म्हणजे महायुतीचे अनेक नेते मुंबईत असतानाही, विधानभवनात अर्ज भरण्यासाठी मात्र कुणीच आलं नाही. त्यामुळे महायुतीत सारं काही आलबेल नसल्याची चर्चा रंगली आहे. 

सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवण्याचा आग्रह
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वात प्रतिष्ठेची लढाई ठरली होती ती बारामतीमधली. नणंद आणि भावजय निवडणुकीत आमनेसामने उभ्या होत्या. मात्र सुनेत्रा पवारांना या लढाईत सुप्रिया सुळेंकडून पराभव स्वीकारावा लागला. हा पराभव कार्यकर्त्यांच्या पचनी पडलेला नव्हता. सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. तेव्हा प्रफुल पटेल यांनी 27 फेब्रुवारी 2024 ला राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला. शरद पवार गटाकडून राज्यसभा खासदारकी मिळाल्याने त्यांनी ती जागा सोडली. या जागेचा कार्यकाळ 4 जुलै 2028 पर्यंत असणार आहे. याच जागेसाठी आता अजित पवारांच्या पक्षाकडून सुनेत्रा पवारांची निवड करण्यात आलीय.

लोकसभा निवडणूक जाहीर होताच सुनेत्रा पवारांना खासदारकीची पाटी बक्षीस देण्यात आली होती. मात्र पराभवानंतर त्या पाटीवरुन सुनेत्रा पवारांची खिल्लीही उडवण्यात आली होती. खरं तर पार्थ पवारही राज्यसभेच्या जागेसाठी इच्छुक होते. मात्र सुनेत्रा पवारांना राज्यसभेची उमेदवारी देत उपमुख्यमंत्री अजित पवारांना अखेर जे साध्य करायचं होतं ते त्यांनी करुन दाखवलं असं म्हणता येईल.

काटेवाडीत जल्लोष
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावावर राज्यसभेच्या उमेदवारीचा शिक्कामार्फत होताच बारामती तालुक्यातील पवारांच्या काटेवाडीत फटाके फोडत गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा करण्यात आला. पेढे लाडू भरवत आनंद साजरा केला.

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x