योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) गेल्या आठवड्यात शिंदे गटाला (Shinde Group) मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा शिंदे गटच शिवसेना असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. यासोबतच शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. या निर्णयानंतर ठाकरे गटाने शिंदे गट आणि निवडणूक आयोगावरही टीका केली आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर मोठा आरोप केला आहे. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हासाठी 2000 कोटींचा सौदा करण्यात आल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
यासोबत रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी पुण्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी विरोधकांचे तळवे चाटले अशी जहरी टीका केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी सध्याचे मुख्यमंत्री आता काय चाटतात? असे म्हटले होते. त्यावर आता शिंदे गटाने आक्रमक होत संजय राऊत यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यानंतर पंचवटी पोलिसांनी संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
संजय राऊत यांच्या विरोधात नाशिकमध्ये मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आलाय. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावर 2 हजार कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचे आरोप केला होता. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत शिंदे सेना आणि मुख्यमंत्र्यांना केंद्र सरकारची चाटूगिरी करत असल्याचे आक्षेपार्ह शब्द वापरत त्यांची बदनामी केली होती असा त्यांच्यावर आरोप आहे. नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात कलम 500 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी योगेश बेलदार यांच्या तक्रारीवरून पोलिसांकडून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
काय म्हणाले होते संजय राऊत?
संजय राऊत यांनी अमित शाह यांना प्रत्युत्तर दिले होते. मात्र टीका करताना संजय राऊत यांची भाषा घसरली होती. मुंबईत पत्रकारांसोबत संवाद साधताना याबाबत भाष्य केले होते. "सध्याचे मुख्यमंत्री आता काय *** चाटताय काय? ही चाटुगिरी महाराष्ट्रात कधीच झाली नव्हती. सध्याचा महाराष्ट्र चाटुगिरीचे टोक आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेण्याचा अधिकार नाही इतकी टोकाची चाटुगिरी महाराष्ट्रात चालू आहे. ज्यांची चाटली जातेय तेच आम्हाला ज्ञान देतायत," असे संजय राऊत म्हणाले होते.