Maharashtra Politics : आघाडीत बिघाडी! शिवसेना-राष्ट्रवादीकडून काँग्रेसवर होणाऱ्या कुरघोडीमुळं नाना पटोले नाराज?

Maharashtra Politics :  लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीत बिघाडीचे वारं वाहतेय. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नाराज असल्याची बातमी समोर येते.

नेहा चौधरी | Updated: Jun 15, 2024, 10:55 AM IST
Maharashtra Politics : आघाडीत बिघाडी! शिवसेना-राष्ट्रवादीकडून काँग्रेसवर होणाऱ्या कुरघोडीमुळं नाना पटोले नाराज? title=
Maharashtra Politics

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुका संपताच महाराष्ट्रात विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या चार जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी 26 जूनला मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचा मतदान होणार आहे. पण महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी अपडेट समोर येते आहे. महाविकास आघाडीत काही आलबेल नाही असं म्हटलं जातंय. 

महाविकास आघाडीत नाना पटोले नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. आज महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेला नाना पटोले येणार नाहीत, असं सांगितलं जातंय. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातत्याने काँग्रेसवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने नाना पटोले नाराज असल्याच बोलं जातंय. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष काँग्रेसला विचारात न घेता परस्पर निर्णय घेऊन नंतर काँग्रेसला कळवतात याबद्दल काँग्रेस पक्षात नाराजी आहे, असं काँग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिलीय. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षात अंतर्गत नाराजी असल्याची माहिती सुत्रानं दिलंय.

महाविकास आघाडीच्या आजच्या पत्रकार परिषदेला नाना पटोले उपस्थित राहणार की नाही. याबाबत माहिती नसल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिलीय. बैठकीचं निमंत्रण नाही आणि आजचा अजेंडा काय? याबाबतही माहिती नसल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलंय.

तर पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार असल्याची माहिती खुद्द नाना पटोले यांनी दिलीय. एकीकडं आजच्या पत्रकार परिषदेला नाना पटोले अनुपस्थित राहणार आहेत. याबाबत वडेट्टीवारांना माहिती नाही. तर जेव्हा काँग्रेसच्या शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेतली होती तेव्हा देखील वडेट्टीवार अनुपस्थित होते. त्यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरू आहे का? अशी चर्चा रंगू लागलीय.