सत्यजित तांबेंचं 'पितळ' उघड, सत्यजित तांबे भाजपात प्रवेश करणार?

सत्यजीत तांबे यांना खुली ऑफर देणारा मंत्री कोण? सत्यजीत तांबे भाजपची ऑफर स्विकारणार?

Updated: Jan 30, 2023, 09:07 PM IST
सत्यजित तांबेंचं 'पितळ' उघड, सत्यजित तांबे भाजपात प्रवेश करणार? title=

Maharashtra Politics : काँग्रेसचा (Congress) हात सोडून सत्यजित तांबे (Satyajit Tambe) विधानपरिषद निवडणुकीच्या मैदानात उतरले. त्यांना भाजपनं (BJP) उघड पाठिंबा जाहीर केला नाही. मात्र सत्यजीत तांबे यांना निवडून आणण्यासाठी भाजपनं पडद्याआडून मदतीचा हात पुढं केलाय. आपल्या कार्यकर्त्यांची मतं तांबेंच्या पारड्यात टाकली. त्यामुळं तांबेंचं पितळ उघडं पडलंय. या मदतीचा सन्मान ठेवत तांबेंनी भाजपात प्रवेश करावा, अशी खुली ऑफरच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी (Radhkrushna Vikhe Patil0 दिलीय. तर दुसरीकडं एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shivsena) पक्षानंही तांबेंच्या पाठीशी आपली ताकद उभी केली आहे. 

सत्यजित तांबे हे ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचे भाचे. नगरच्या राजकारणात विखे विरुद्ध थोरात असं विळ्याभोपळ्याचं नातं आहे. भाच्याला उघड पाठिंबा देऊन थोरातांचा मामा बनवण्याची खेळी आता खेळली जातेय. तांबेंच्या प्रवेशासाठी पायघड्या अंथरल्या जातायत. दरम्यान, आपण अपक्षच राहणार असल्याचा दावा तांबेंनी केलाय.

नाशिक पदवीधर मतदारसंघात (Nashik Graduate Election) भाजपनं तांबेंची पाठराखण केलीय. तर महाविकास आघाडीनं (Mahavikas Aghadi) शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिलाय. या चुरशीच्या सामन्यात कोण बाजी मारणार, हे येत्या गुरुवारी स्पष्ट होईल. मात्र नगरचं पुढचं राजकारण या निकालावर अवलंबून असेल.

सुजय विखे मतदानापासून वंचित
दरम्यान, भाजप खासदार सुजय विखे मतदानापासून वंचित राहिले. नाशिक पदवीधर विधानपरिषद निवडणुकीत त्यांना मतदान करता आलं नाही. कारण अहमदनगरच्या मतदार यादीतून त्यांचं नाव गायब होतं. नगर जिल्ह्याच्या ऑनलाईन यादीत सुजय दिगंबर विखे नावाचा एक मतदार होता. मात्र यादीत खासदार विखेंचं नावच नव्हतं.  असं असलं तरी भूमीपुत्राच्या मुद्यावरून या निवडणुकीत त्यांनी सत्यजित तांबेंना समर्थन दिलं.

2 फेब्रुवारीला मतमोजणी
विधानपरिषद निवडणुकीसाठीचं मतदान आज पार पडलंय. संध्याकाळी ४ पर्यंत मतदानाची वेळ होती. मात्र नागपूर तसेच नांदेडमधील काही मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी असल्यानं सायंकाळी साडेपाच पर्यंत मतदान सुरू होतं. या निवडणुका भाजपा आणि महाविकास आघाडीसाठी परीक्षा असणार आहेत. विधान परिषदेच्या नाशिक ,अमरावती पदवीधर तर मराठवाडा, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघात आज मतदान झालं. यापैकी नाशिक, नागपूर आणि मराठवाडाच्या लढतींकडे सर्वांचं लक्ष लागलंय. या निवडणुकीची मतमोजणी 2 फेब्रुवारीला म्हणजे गुरुवारी होणार आहे.