Maharashtra Politics : राज्याच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराज (chhatrapati sambhaji maharaj) धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षक होते, असं विधान केल्याने राज्यातील वातावरण सध्या तापलं आहे. अजित पवार यांच्या विधानावरुन भाजपसह (BJP) शिंदे गटही आक्रमक झाले आहेत. अजित पवार यांच्या बचावासाठी जितेंद्र आव्हाड पुढे आल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना लक्ष्य केले होते. यावर प्रत्युत्तर देताना अजित पवार यांनी नितेश राणे यांचा 'टिल्ल्या' असा उल्लेख केला आहे. यावरुन आता नवा वाद सुरु झाला आहे.
संभाजी महाराजांबद्दल काही चुकीचं बोललो नाही - अजित पवार
अजित पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत त्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत खुलासा केला. "छत्रपती संभाजी महाराजांबाबत सभागृहात केलेल्या विधानावर ठाम आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याचं रक्षण केलं. त्यामुळे संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षक म्हणणेच न्याय देणार आहे. संभाजी महाराजांबद्दल काही चुकीचं बोललो, असं मला वाटत नाही. मी माझी भूमिका मांडली, ज्यांना योग्य वाटेल त्यांनी स्वीकारावी," असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
"त्यांची उंची आणि झेप किती"
यावेळी पत्रकार परिषदेत अजित पवार यांना नितेश राणेंनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर दिलं आहे. "टिल्ल्या लोकांनी हे सांगण्याची गरज नाही. त्यांची उंची आणि झेप किती, त्यांना मी कशाला उत्तर देऊ. माझे प्रवक्ते त्यांना उत्तर देतील. असल्या लोकांच्या नादी लागत नसतो," असं अजित पवार यांनी म्हटले. अजित पवार यांनी दिलेल्या उत्तराने पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला होता.
अजित पवार यांची वैचारिक उंची कळाली - नितेश राणे
त्यानंतर आता नितेश राणे यांनी ट्वीट करत अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. "लघूशंकेनी धरणाची उंची वाढवणारे धरणवीर यांनी मला देवाने दिलेल्या शरीरयष्टीवरून भाष्य केले यावरूनच त्यांची वैचारिक उंची कळाली व हे सिद्ध झाले की यांना 'औरंग्यावरची' टिका सहन होत नाही म्हणूनच यांचे काका छत्रपती शिवाजी महारांजाच्या समाधीपुढे कधीही नतमस्तक झाले नाही," अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.
लघूशंकेनी धरणाची उंची वाढवणारे धरणवीर यांनी मला देवाने दिलेल्या शरीरयष्टीवरून भाष्य केले यावरूनच त्यांची वैचारिक उंची कळाली व हे सिद्ध झाले की यांना ‘औरंग्यावरची ‘ टिका सहन होत नाही म्हणूनच यांचे काका छत्रपती शिवाजी महारांजाच्या समाधीपुढे कधीही नतमस्तक झाले नाही.@AjitPawarSpeaks
— nitesh rane (@NiteshNRane) January 5, 2023
काय म्हणाले होते नितेश राणे?
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब क्रूर असता, तर विष्णूचं मंदिरही तोडलं असतं ना? असं वक्तव्य केल्यानंतर नितेश राणे यांनी त्यांना पत्राद्वारे प्रत्युत्तर दिलं होते. "औरंजगजेब क्रूर असता तर विष्णूचं मंदिरही तोडलं असता ना? असं केलेलं वक्तव्य स्वाभाविकच आहे. कारण आपले सर्वस्व यांची श्रद्धा औरंगजेबावर आहे, हे केव्हाच सिद्ध झालं आहे! कारण त्यांनी तहआयुष्यात कधीही आमच्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर एकदाही नतमस्तक केलं नाही किंवा रायगडाच्या दिशेने त्यांचे कधी पाय वळाले नाही," असे नितेश राणे यांनी म्हटलं होतं.