तुमचा आमदार खरचं काम करतो का? मुंबईतल्या आमदारांचं प्रगती पुस्तक जारी, सदा सरवणकर, राम कदम नापास

Maharashtra Politics :  प्रजा फाउंडेशननं मुंबईतील आमदारांचं प्रगती पुस्तक जारी केलंय. 2023 ते 2024 या अर्थसंकल्पीय अधिवेशन  दरम्यानच्या कालावधीतील आमदारांच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडण्यात आलाय. मुंबईतल्या कोणत्या आमदाराला सर्वाधिक गुण मिळालेत तर कोणत्या आमदाराला सर्वात कमी गुण मिळालेत पाहूयात. 

वनिता कांबळे | Updated: Aug 21, 2024, 08:17 PM IST
तुमचा आमदार खरचं काम करतो का? मुंबईतल्या आमदारांचं प्रगती पुस्तक जारी, सदा सरवणकर, राम कदम नापास title=

Praja Foundation Report On Mumbai MLA Performerce: शाळा, कॉलेजमध्ये  पास-नापासचं प्रगती पुस्तक हातात येईपर्यंत मोठी धाकधूक असते.  प्रगती पुस्तक मिळाल्यानंतर गुणांची चर्चा आपण करतो . अगदी त्याचप्रमाणं  आमदारांचं प्रगती पुस्तक प्रकाशित करण्यात आलंय.  

प्रजा फाउंडेशन ही स्वयंसेवी संस्था दरवर्षी मुंबईतील आमदारांच्या कामगिरीचं मूल्यमापन करून आमदारांचं रिपोर्ट कार्ड जारी करते.  यावर्षी मूल्यमापनाची  प्रक्रिया अधिक व्यापक करण्यात आलीय. या मूल्यमापनात किमान तीन वर्ष सदस्य असलेल्या आमदारांच्या एकत्रित कामगिरीचं मूल्यांकन करण्यात आलंय. 

या मूल्यमापनातून काढण्यात आलेल्या निष्कर्षानुसार नागरिकांचे प्रश्न मांडणाऱ्या पहिल्या तीन क्रमाकांत सर्वाधिक गुण प्राप्त करणारे मुंबईतील  आमदार  काँग्रेसचे मुंबादेवीचे आमदार अमिन पटेल यांनी 82.92 टक्के गुण मिळवत  पुन्हा पहिला क्रमांक पटकावलाय. पटेल हे गेल्या तीन वर्षांपासून पहिला क्रमांक पटकावत आहेत.  तर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी 78.71 टक्के गुण मिळवत दुसऱ्या स्थानी आहेत  तर धारावीतील तत्कालीन आमदार वर्षा गायकवाड यांनी तिसरा क्रमांक पटकावलाय. गायकवाड यांना 76.51 टक्के गुण मिळालेत. 

आमदारांच्या कामगिरीच्या लेखाजोखानुसार महाविकास आघाडीच्या आमदारांनी बाजी मारलेली दिसून येतेय. तर  सर्वात खराब कामगिरी करणाऱ्या तळाच्या 5 आमदारांमध्ये  सर्वात कमी गुण प्राप्त करणारे मुंबईतील आमदार  भाजपचे राम कदम, शिवसेना शिंदे गटाचे  दिलीप लांडे, प्रकाश सुर्वे, सदा सरवणकर आणि राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांना सर्वात कमी म्हणजे फक्त 18 टक्के गुण मिळालेत. तर सदा सरवणकर यांना 27.27 टक्के तर राम कदम यांना 33.07 टक्के गुण मिळालेत.

आमदारांच्या कामगिरीवरुन संबंधित राजकीय पक्षांच्या कामगिरीचा विचार केल्यास मुंबईतील काँग्रेस आमदारांची विधानसभेतील कामगिरी नेत्रदीपक ठरलीय. काँग्रेसनं सर्वाधिक 72.56 टक्के गुण मिळवत पहिले स्थान पटकावलं. तर 60.08  टक्के  मिळवून भाजप दुसऱ्या स्थानी आहे. महाराष्ट्रात14 व्या विधानसभेचे कामकाज हे फक्त 119 दिवसच चाललंय. इतर राज्यांच्या कामकाजाची  तुलना केल्यास महाराष्ट्र सातव्या स्थानी आहे.  लोकप्रतिनिधी संवैधानिक जबाबदाऱ्या  पार पाडण्यात कमी पडत असल्याचं  प्रगती पुस्तकात नमूद करण्यात आल्यानं चिंता वाढलीय.