इंदापुरात राजकीय वैऱ्यांची दिलजमाई? दत्तामामा भरणे की हर्षवर्धन पाटील उमेदवार?

Maharashtra Politics : महायुतीत तीन पक्षांचं भेंडोळं झाल्यानं विधानसभा जागावाटपावरून हमरी तुमरी सुरु झालीये. इंदापूर मतदारसंघाचा तिढा सोडवणं महायुतीच्या नेत्यांसाठी डोकेदुखी ठरणाराय. त्यातच पारंपरिक विरोधक असलेले दत्तामामा भरणे आणि हर्षवर्धन पाटील एकमेकांवर स्तुतीसुमनं उधळताना दिसतायत.. या दोघांमध्ये दिलजमाई तर झाली नाही ना? अशी चर्चा आता रंगलीय

राजीव कासले | Updated: Aug 22, 2024, 11:03 PM IST
इंदापुरात राजकीय वैऱ्यांची दिलजमाई? दत्तामामा भरणे की हर्षवर्धन पाटील उमेदवार? title=

Maharashtra Politics : पुण्यातील इंदापूर विधानसभा मतदारसंघात  (Indapur Vidhansabha Constituency) उमेदवारीवरुन महायुतीत आतापासून रस्सीखेच सुरू झालीये. एकीकडे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांची उमेदवारी निश्चित मानली जातेयं.  तर दुसरीकडे भाजप नेते हर्षवर्धन पाटलांनी (Harshwardhan Patil) देखील उमेदवारीसाठी लॉबिंग सुरु केलंय. लोकसभेची निवडणूक झाली, महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला, त्यानंतर आता विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरु झालीय.. जागावाटपाचा निर्णय अद्याप झालेला नसताना, हर्षवर्धन पाटलांनी वाढदिवसानिमित्त जोरदार शक्तिप्रदर्शन करत निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. गेल्या महिन्यात हर्षवर्धन पाटलांच्या समर्थकांकडून 'आमचा स्वाभिमान आमचं विमान' अशा आशयाचं बॅनर लावत 'लागा तयारीला' असं आवाहन केलं होतं.

लोकसभेआधी हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांनी अजित पवारांनी (Ajit Pawar) आमची तीन वेळा शब्द फिरवून फसवणूक केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे विधानसभेला मदत करेल त्यांचं लोकसभेला काम करु, असं विधान केलं होतं. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांसोबत बंद दाराआड झालेल्या बैठकीत इंदापूरच्या जागेसंदर्भात हर्षवर्धन पाटलांना अजित पवारांनी शब्द दिलेला आहे त्या शब्दाप्रमाणे वरिष्ठ नेते निर्णय घेतील त्याची वाट बघत असल्याचं हर्षवर्धन पाटलांनी सांगितलंय.

तर गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चाही सुरु होत्या मात्र, पाटलांनी या चर्चा फेटाळल्यात. इंदापूर मतदारसंघातून महायुतीकडून हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी मिळाल्यास जोरदार काम करणार असं विधान विद्यमान आमदार दत्तामामा भरणेंनी केल्यानं चर्चांना उधाण आलंय.  यावर महायुतीकडून 'उमेदवार कोण ना मला माहिती ना दत्तामामा भरणेंना माहिती' असं उत्तर हर्षवर्धन पाटलांनी दिलंय..

त्यामुळे इंदापूर मतदारसंघातील पारंपारिक विरोधक मानले जाणारे हर्षवर्धन पाटील आणि दत्तामामा भरणे यांच्यात दिलजमाई तर झाली नाही ना?, अश्या चर्चा राजकीय वर्तूळात होत आहेत.