भारतीय क्रिकेट संघाला सलग तिसऱ्यांदा मिळणार 'हा' बहुमान, ICC ने दिली मोठी अपडेट

Cricket : भारतीय क्रिकेट संघ सलग तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये खेळण्याची शक्यता आहे. WTC 2023-25 च्या पॉईंटटेबलमध्ये टीम इंडिया अव्वल स्थानावर आहे. टीम इंडिया अंतिम फेरीत दाखल होणार का याबाबत आयसीसीने मोठी अपडेट दिली आहे. 

राजीव कासले | Updated: Sep 12, 2024, 06:35 PM IST
भारतीय क्रिकेट संघाला सलग तिसऱ्यांदा मिळणार 'हा' बहुमान, ICC ने दिली मोठी अपडेट

Cricket : मोठ्या ब्रेकनंतर भारतीय क्रिकेट संघ मैदानावर उतरण्यासाठी सज्ज झाली आहे. भारत आणि बांगलादेशदरम्यान दोन कसोटी सामन्यांची मालिका (India vs Bangladesh Test Series) खेळवली जाणार असून यातला पहिला सामना 19 सप्टेंबरला रंगणार आहे. ही कसोटी मालिका भारतासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (WTC) दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. भारतीय क्रिकेट संघ गेल्या दोन्ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिच्या अंतिम फेरीत खेळला आहे. पण दोन्ही वेळा पराभव पत्करावा लागला. आता पुन्हा एकदा टीम इंडियाला (Team India) अंतिम फेरीत धडक मारण्याची संधी आहे.

Add Zee News as a Preferred Source

टीम इंडिया WTC फायनलमध्ये?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या पॉईंटटेबमध्ये टीम इंडिया अव्वल स्थानावर आहे. भारताने 9 पैकी 6 कसोटी सामने जिंकले आहेत. तर दोन कसोटी सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. तर एक सामना ड्रॉ राहिला. टीम इंडियाची टक्केवारी 68.52 इतकी आहे. टीम इंडियाला आता आणखी दहा कसोटी सामने खेळायचे आहेत. यात 5 कसोटी सामने भारतात तर पाच कसोटी सामने भारताबाहेर खेळवले जाणार आहेत. सर्व 10 कसोटी सामने जिंकल्यास टीम इंडियाच्या विजयाची टक्केवारी 85.09 इतकी होईल. पण शक्यता फारच कमी आहे.

टीम इंडियाचे 10 पैकी 2 कसोटी सामने बांगलादेशविरुद्ध आणि 3 कसोटी सामने न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर खेळणार आहे. तर पाच कसोटी सामने ऑस्ट्रेलियात खेळवले जाणार आहेत. भारतात खेळवले जाणारे पाचही कसोटी सामने टीम इंडियाने जिंकल्यास विजयाची टक्केवारी 79.76 इतकी होईल. WTC च्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी ही टक्केवारी पुरेशी आहे.

इतर संघांची काय परिस्थिती?

गेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा खिताब ऑस्ट्रेलियाने पटकावला होता. पण यावेळी ऑस्ट्रेलियाला अंतिम सामना गाठण्यासाठी कठोर मेहनत करावी लागणार आहे. यंदाच्या हंगामात ऑस्ट्रेलियाकडे 7 कसोटी सामने बाकी आहेत. यात भारताविरुद्ध 5 आणि श्रीलंकेविरुद्ध 2 कसोटी सामन्यांचा समावेश आहे. हे सातही सामने जिंकल्यास ऑस्ट्रेलियाच्या विजयाची टक्केवारी 76.32 इतकी होते. दुसरीकडे न्यूझीलंडकडे 8 कसोटी सामने आहे. सर्व सामने जिंकल्यास न्यूझीलंडच्या विजयाची टक्केवारी 78.57 इतकी होते. म्हणजे न्यूझीलंड ऑस्ट्रेलियापेक्षा एक पाऊल पुढे राहिल.

याशिवाय बांगलादेशचा संघ 72.92 टक्क्यापर्यंत पोहोचू शकतो. तर श्रीलंका 69.23 अंक, इंग्लंड 57.95, दक्षिण आफ्रीका 69.44, पाकिस्तान 59.52 आणि वेस्टइंडीज 43.59 अंकांपर्यंत पोहोचू शकतात. अशात या संघांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणं जवळपास अश्क्य आहे. म्हणजे भारत सलग तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप खेळण्याची शक्यता वाढली आहे, दुसऱ्या स्थानासाठी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात लढत असणार आहे.

About the Author