Weather Update : मान्सूनची माघार, राज्यात उन्हाच्या झळा; देशात चाहूल देतोय हिवाळा

Maharashra Rain : पावसाच्या परतीचा प्रवास आता सुरु झाला असून, येत्या काही दिवसांमध्ये राज्यासह देशातील हवामान मोठ्या प्रमाणात बदलणार आहे.   

सायली पाटील | Updated: Oct 9, 2023, 08:10 AM IST
Weather Update : मान्सूनची माघार, राज्यात उन्हाच्या झळा; देशात चाहूल देतोय हिवाळा  title=
Maharashtra Rain latest Weather Update winter vibes

Maharashra Rain : देशाच्या उत्तरेकडील राज्यांमधून (Monsoon) मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु झाला आणि पाहता पाहता महाराष्ट्रातूनही मान्सून ठरलेल्या वेळेत माघारी फिरताना दिसला. येत्या काही दिवसांमध्ये मान्सून राज्यातून पूर्णपणे पावलं मागं घेताना दिसेल. यादरम्यान काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरी वगळता उर्वरित राज्यात मात्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. तर, समुद्रकिनारी असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये हवेतील आर्द्रता वाढू शकते असाही अंदाज वर्तवला जात असून, तसं चित्रही सध्या पाहायला मिळत आहे. 

तापमानात वाढ... 

मागील काही दिवसांपासून विदर्भापासून नाशिक, पुणे आणि मुंबई या भागांमध्ये तापमान वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. दुपारच्या वेळी या भागांमध्ये उन्हाच्या झळा आणखी तीव्र होताना दिसत असल्यामुळं पुढच्या काही दिवसांमध्येही तापमानाचा आकडा असाच वाढलेला निदर्शनास येईल. अचानक वाढलेल्या तापमानामुळं नागरिकांना आरोग्याच्या काही अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यातच पहाटेच्या वेळी राज्यात तापमानाचा आकडा कमी होणार असून, थंडीची चाहूल लागणार आहे. त्यामुळं नागरिकांनी त्या अनुषंगानंही तयार राहावं असं आवाहन करण्यात येत आहे. 

हेसुद्धा वाचा : नवी मुंबई, पनवेलमध्ये आज पाणीपुरवठा बंद; किती तासांसाठी सोसावा लागणार त्रास?

हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये वातावरण बिघडणार 

पश्चिमी झंझावात पुन्हा एकदा सक्रिय होत असल्यामुळं पुढील 48 तासांमध्ये या भागात पावसाची शक्यत वर्तवण्यात आली आहे. पावसाच्या धर्तीवर इथं यलो अलर्टही देण्यात आला आहे. हिमाचल आणि उत्तराखंडच्या मैदानी भागांमध्ये येत्या काही दिवसांच पावसाची हजेरी असेल तर, पर्वतीय क्षेत्रांमध्ये मात्र बर्फवृष्टी होणार आहे. जम्मू काश्मीरमध्येही अशीच काहीशी परिस्थिती असेल. उत्तरेकडील राज्यांमध्ये किमान तापमानात काहीशी घट नोंदवली जाणार आहे. 

पुढील काही दिवसांमध्ये सुरु होणारा सुट्ट्यांचा हंगाम पाहता उत्तराखंड, हिमाचल आणि जम्मू काश्मीर सारख्या भागांकडे पर्यटकांचा कल वाढताना दिसणार आहे. त्यामुळं तिथं जाणाऱ्या सर्वांनीच हवमानाचा आढावा घेऊनच पुढील बेत आखावेत असा इशारा देण्यात आला आहे.