दारूसाठी विरोध करणं जन्मदात्या आईच्या जीवावर बेतलं, सैतानासारखं मुलानंच आईला संपवलं

 या घटनेमुळे संताप व्यक्त केला जातोय.

Updated: Aug 7, 2021, 08:31 PM IST
दारूसाठी विरोध करणं जन्मदात्या आईच्या जीवावर बेतलं, सैतानासारखं मुलानंच आईला संपवलं  title=

मुंबई : सध्या प्रत्येकाला आपल्या नात्यांचा विसर पडलाय. सख्खे भाऊ पक्के वैरी असल्यासारखे वागतात. काही एकर जागेसाठी एकमेकांच्या अंगावर धावून जातात. वेळ आली तर एक घाव दोन तुकडे करण्याचीही तयारी असते. तर दुसऱ्या ठिकाणी जी आई आपल्या  मुलाला प्रेमाणे वाढवून मोठं करते, त्याच आईवर काही सैतानी मुलं हात उगरतात, मारहाण करतात. आता राज्यातील विविध 2 एकसारख्याचं घटना घडल्यात. ही घटना ऐकून तुमच्या तळपायातली आग नक्कीच मस्तकात जाईल, आणि म्हणाल की हे नक्की मुलं आहेत की सैतान? तर झालंय असं की, दारु पिण्यास विरोध केल्याने मुलाने संपवलं तर दुसऱ्या ठिकाणी संतापातून मुलाने आईचा जीव घेतला. विविध 2 जिल्ह्यात मुलाने आईला संपवल्याची घटना घडलीय. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जातेय, सोबतच त्या मुलांबद्दल संताप व्यक्त केला जातोय. या दोन वेगवेगळ्या घटना सातारा (Satara) आणि जालन्यात (Jalna) घडल्यात. (maharashtra Satara and Jalna a boys has killed his mother)  

साताऱ्यात संतापातून आईला संपवलं.....

मुलाकडून आईच्या हत्येची घटना तशी नवी नाही. मात्र आईची हत्या करून स्वत: पोलिसांना जाऊन सांगण्याची धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यातल्या रहिमतपूरमध्ये घडलीय. शहाजी पवार आणि त्याची आई सुलोचना पवार यांच्यात कडाक्याच भांडण झालं. शहाजीतला राक्षस जागा झाला त्यानं थेट आईला लोखंडी पट्ट्यानं बेदम मारहाण केली. यात त्याच्या आईच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तिचा जागीच अंत झाला. आईची हत्या केल्यानंतर शहाजी स्वत: पोलिस स्टेशनला गेला आणि रागात आईचा खून केल्याची कबुली दिली.  

जालन्यात दारु पिण्यास विरोध करणं आईच्या जीवावर बेतलं...  

जालन्यातही आई-मुलाच्या नात्याचीच हत्या करणारी दुसरी धक्कादायक घटना घडली. परतूर तालुक्यातल्या सखाराम शिंदेला दारूचं व्यसन होतं. घरातल्या वस्तू विकून तो दारूची तलप भागवायला लागला. आता तर त्यानं थेट घरातलं धान्यच विक्रीला काढलं. मात्र त्याच्या आईनं दारूसाठी धान्य विकायला विरोध केला. त्याचा राग डोक्यात ठेवून त्यानं आईच्या डोक्यात काठी घातली. या हल्ल्यात सखारामची आई रंदावणी शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून दारुड्या सखारामला जेरबंद केलं.

पोटचे गोळेच आपल्या गळ्याचा घोट घेतील असा स्वप्नातही सुलोचना पवार आणि रंदावणी शिंदेंनी केला नसेल. मात्र शहाजी आणि सखारामसारख्या नराधमांनी अशा राक्षसी कृत्यातून माय-लेकाच्या नात्यालाच काळीमा फासलाय.