धक्कादायक बातमी... 7 बहिणींवर आली वडिलांच्या पार्थिवाला खांदा देण्याची वेळ

आता एक धक्कादायक बातमी. 7 बहिणींवर आपल्याचे वडिलांच्या पार्थिवाला खांदा देण्याची वेळ आली.  

Updated: Jun 8, 2021, 09:35 AM IST
धक्कादायक बातमी... 7 बहिणींवर आली वडिलांच्या पार्थिवाला खांदा देण्याची वेळ

आशिष अम्बाडे / चंद्रपूर : आता एक धक्कादायक बातमी. 7 बहिणींवर आपल्याचे वडिलांच्या पार्थिवाला खांदा देण्याची वेळ आली. जात पंचायतीच्या जाचामुळे हतबल ठरलेल्या बहिणींना नाईलाजाने हे पाऊल उचलावं लागले. चंद्रपुरात जात पंचायतीने कुटुंबाला बहिष्कृत केले. वडिलांचा मृत्यू झाल्यावर या बहिणींनी पार्थिवाला खांदा देत निर्णयाविरोधात एल्गार केला आणि सणसणीत चपराक केला. 

कोरोना काळात जातीपातीच्या भिंती धडाधडा कोसळून माणुसकी सर्वोपरी असल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते. मात्र हे सगळे तकलादू होते हे दर्शवणारी एक घटना चंद्रपुरात उघडकीस आली आहे. गोंधळी समाजाच्या जात पंचायतीने शहरातील ओगले नामक एक परिवार बहिष्कृत केला. या परिवारातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यावर कोणीही अंत्यसंस्काराला जाऊ नये, असे फर्मान जातपंचायतीने काढले. अखेर समाज पुढे येत नसल्याचे बघून सात मुलींनी वडिलांच्या पार्थिवाला खांदा दिला. पुरोगामी महाराष्ट्रातही जात पंचायतीची दुर्दैवी पकड प्रभावी असल्याचे या निमित्ताने पुढे आले आहे.

चंद्रपूर शहरातील भंगाराम वॉर्डातील निवासी प्रकाश ओगले ५८ यांचा काल आजाराने मृत्यू झाला. मात्र गोंधळी समाजाच्या जात पंचायतीने त्यांच्यावर बहिष्कार टाकला असल्याने समाजातील कुणीही पार्थिवास खांदा देण्यासाठी पुढे आले नाही. जो त्यांच्या पार्थिवाला खांदा देईल त्याला जात बहिष्कृत करण्यात येईल अशी धमकी जात पंचायतीने दिली होती. 

प्रकाश ओगले यांना 7 मुली आणि 2 मुले आहेत. घरच्या गरीब परिस्थितीमुळे गेली काही वर्षे हा परिवार गोंधळी समाजातील वेगवेगळ्या समारंभात सहभागी होत नव्हता. हे कुटुंब समाजातील सामूहिक भोजनात सहभागी होत नव्हते. त्यामुळे समाजातील मानाचा कोणताही व्यवहार या कुटुंबाशी केला जात नव्हता. ओगले यांच्या मृत्यूनंतर गोंधळी समाज रितीप्रमाणे अंत्यविधीसाठी पुढे आला नाही. ओगले यांच्या मृत्यूपश्चात मुलीने याविषयी जात पंचायतीला विचारणा केल्यावर त्यांना दंड भरा, असे फर्मान सोडण्यात आले. ओगले यांच्या  MPSC स्पर्धा परीक्षा देणाऱ्या जयश्री नामक मुलीने पंचायतीला धुडकावून धाडसी निर्णय घेतला. 7 बहिणींनी मिळून खांदा देत अंत्यविधी केले. 

या घटनेने पुरोगामी महाराष्ट्रात जात पंचायत आजही किती निर्णायक आहे, हे सिद्ध झाले आहे. समाजातील काही प्रमुख व्यक्ती स्वतःला कायद्यापेक्षा वर मानत असून त्यांनी समाजात हुकूमशाही सुरू केली आहे. या व्यवस्थे विरोधात कोणीही उघड वा दबक्या आवाजात विरोध केल्यावर त्यांना बहिष्कृत केले जाते. ओगले कुटुंबावर ओढवलेला प्रसंग दुर्दैवी असून गोंधळी समाजाच्या जात पंचायतीच्या चाप बसणे गरजेचे असल्याचे मत खुद्द समाजातून पुढे आले आहे.

महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात जात पंचायतींची पकड अजूनही किती मजबूत आहे, याचं हे आणखी एक दुर्दैवी उदाहरण. अशा सडक्या मनोवृत्तीच्या जात पंचायतींवर कायद्यानं कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी.