गळकं छप्पर, तडे गेलेल्या भिंती! राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचं विदारक वास्तव... भंडाऱ्यात विद्यार्थिनीच्या मृत्यूने खळबळ

Maharashtra ZP School : राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचं विदारक वास्तव समोर आलं आहे. राज्यातील अनेक गावातील जिल्हा परषद शाळांची अवस्था बिकट झालीय. विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शाळेत जातायत.  जिल्हा परिषदेच्या शाळांच्या दुरवस्थेचा लेखाजोखाच झी २४ तास आपल्यासमोर मांडतंय.

राजीव कासले | Updated: Jul 3, 2024, 03:08 PM IST
गळकं छप्पर, तडे गेलेल्या भिंती! राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचं विदारक वास्तव... भंडाऱ्यात विद्यार्थिनीच्या मृत्यूने खळबळ title=

Maharashtra ZP School : राज्यातल्या अनेक शाळांमध्ये मुलभूत सोयीसुविधांचाच अभाव आहे. राज्यभरातल्या अनेक जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये  (ZP School) गळकं छत, पडक्या भिंती असलेल्या, कुठे फुटक्या फरश्या दिसून येतायत.  हिंगोली, सातारा, कोल्हापूर, नांदेडसह अनेक जिल्ह्यात हीच परिस्थीती आहे.  अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचे हाल होत असून विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शाळेत जातात. मुलभूत सुविधांचा इथं मोठ्या प्रमाणात अभाव दिसून येतोय. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या दुरवस्थेचा लेखाजोखाच झी 24 तास आपल्यासमोर मांडतंय.  

भंडाऱ्यात विद्यार्थिनीचा मृत्यू
जिल्हा परिषद शाळेत शॉक लागून पहिल्या वर्गातील विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. भंडऱ्याच्या (Bhandara) लाखांदूर तालुक्यातील पुयार इथं ही दुर्देवी घटना घडलीय. यशस्वी सोपान राऊत असं मृत 6 वर्षीय मुलीचं नाव आहे. बुधवारी सकाळी दहा वाजेपूर्वी यशस्वी राऊत ही विद्यार्थिनी शाळेत आली. ती लघुशंकेला गेली असता जवळच लावण्यात आलेल्या RO च्या जिवंत विद्युत तारेचा तिला शॉक लागला. यशस्वीला लाखांदूर इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणलं असता तिला  डॉक्टरांनी मृत घोषित केले. यासंदर्भात पोलीस पुढील तपास करतायत. 

सावंतवाडीत शाळेची इमारत मोडकळीस
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडीत जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत एका बाजूने कोसळलीय. सावंतवाडीतील जिल्हा परिषद शाळा नं 1 मधली शाळा मोडकळीस आीय.. शाळा बंद असताना इमारतीचा काही भाग कोसळल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. मात्र कोसळलेल्या जिल्हा परिषदेच्या इमारतीत शाळा सुरू ठेवल्यामुळे पालकांकडून नाराजी व्यक्त केली जातेय.. धोकादायक इमारतीत शाळा सुरू असल्याने पालकांकडून मात्र नाराजी व्यक्त केली जातेय.

गळकं छप्पर, तडे गेलेल्या भिंती
लातूर जिल्ह्यात चिमुकल्या विद्यार्थ्यांवर पावसाने गळती लागलेल्या इमारतीमध्ये बसून धडे गिरवण्याची वेळ आली आहे.  जिल्ह्यात जवळपास 87 शाळांना गळती लागली आहे. तर 118 शाळांच्या शौचालयाचा प्रश्न गंभीर बनलाय. याप्रकाराकडे शिक्षण विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप पालकांनी केलाय. तर राज्याला शिक्षण मंत्री आहे का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय..

झी 24 तासच्या बातमीची दखल
झी 24 तासच्या बातमीची विरोधकांकडून दखल घेण्यात आली आहे.  धनदांडग्यांच्या घशात शाळा घालायच्या असल्याचा आरोप काँग्रेस आमदार भाई जगतापांनी केलाय. तर सरकारला ZP शाळा बंद करायच्या आहेत असं काँग्रेस आमदार यशोमती ठाकुरांनी म्हटलंय. यावर शाळांच्या दुरुस्तीचे प्रयत्न करणार असल्याचं शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईकांनी सांगितलंय. दरम्यान, झेडपी शाळांच्या दुरवस्थेच्या झी 24 तासच्या बातमीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गंभीर दखल घेतलीय. शिक्षणमंत्री आणि शिक्षणसचिवांना यासंदर्भात उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्यायत.