जळगाव : जिल्हा परिषद सदस्य असलेल्या मंत्र्याच्या मुलाने सरकारी अधिकाऱ्यांना भर बैठकीतच धमकावल्याची घटना घडली आहे. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रताप पाटील यांनी दमदाटी करत शिवीगाळही केली.
जळगावमधल्या राज्य परिवहन विभागाच्या महिला विभाग नियंत्रकाच्या दालनात हा प्रकार घडला. जळगाव जिल्ह्यातल्या पाळधी बस स्थानकावरच्या असुविधांबाबत शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत एसटी महामंडळ अधिकाऱ्यांच्या दालनात निवेदन देण्यासाठी गेले होते. त्यावेळी एसटी महामंडळाच्या बांधकाम विभाग अधिकाऱ्यांनी प्रताप पाटील यांना उडवाउडवीची उत्तरं दिल्यानं, प्रताप पाटील अधिकाऱ्यांवर भडकले.
राज्याचे परिवहन मंत्री आमच्या पक्षाचे असूनही आमची कामं होत नाहीत. शिवसेना आमदारांच्या पत्राची दखल अधिकारी घेत नाहीत, असा आरोप प्रताप पाटील यांनी यावेळी केला. एवढ्यावरच न थांबता, कामं करा अन्यथा वरच्या मजल्यावरुन खाली फेकून देईन, अशी धमकीच प्रताप पाटील यांनी दिली.