Maharashtra Tourist Places : रोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढत थोडी उसंत मिळावी, यासाठी मग काही ठिकाणी भटकंतीसाठी जाण्याचे बेत आखले जातात. कुटुंबासह असो किंवा मग मित्रमंडळींसमवेत, निसर्गाच्या कुशीत दडलेल्या ठिकाणांना भेट देण्याला अनेकांचीच पसंती असती. पण, अशा वेळी एक सूर मात्र बरेचजण आळवतात, तो म्हणजे 'त्याचत्याच ठिकाणी नको जाऊया...'.
निसर्ग प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो आणि याच निसर्गाचं वेगळं रूप तुमच्यापासून अवघ्या काही तासांच्याच अंतरावर आहे. हे ठिकाण इतकं सुंदर आहे की अनेकजण त्याला महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून संबोधतात. ऋतू कोणताही असो येथील माती, झाडंफुलं आणि जीवसृष्टी प्रत्येक ऋतुला आपलंसं करते आणि इथं येथे येणाऱ्या प्रत्येकाचं भान हरपते. हे ठिकाण म्हणजे साताऱ्यातील महाबळेश्वरनजीक असणारं तापोळा.
पर्यटनाचा केंद्रबिंदू असणाऱ्या महाबळेश्वरपासून काही अंतवर असणारं हे गाव पाहताना आपण खरंच काश्मीरच्या खोऱ्यामध्ये असल्याची जाणीव होते. तिथं दल लेक आहे, इथं तापोळ्याचा भलामोठा तलाव आहे. या तलावात तुम्हाला नौकाविहाराचा आनंद घेता येतो. इतिहासात रमणाऱ्यांना इथं जयगड, वासोट्याला भेट देता येते. निसर्गाच्या सानिध्ध्यात तुम्हाला कॅम्पिंग अर्थात तंबूमध्ये राहण्याचा आनंद घ्यायचा असेल तरीही तापोळ्याला येऊन तुमची ही हौसही भागवता येते.
मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूरातून तापोळ्याला अगदी सहजपणे पोहोचता येतं. शनिवार रविवारच्या आठवडी सुट्टीला जोडून एक किंवा दोन दिवसांची सुट्टी घेतल्यास तापोळ्यात अगदी मनमुराद जगता येतं. वाहनांची वर्दळ नाही, माणसांची गर्दी नाही आणि कामाचा व्यापही नाही. फक्त निसर्ग आणि तुम्ही... असाच अनुभव हा तापोळा तुम्हाला देतो. कलासक्त मनाच्या अनेकांसाठी तापोळा म्हणजे त्यांच्या कलाविष्कारांना वाव देण्याची एक कमाल जागा.
स्वत:च्या वाहनानं तुम्ही वाई, तायघाटमार्गे पाचगणी ओलांडून तापोळा गाठू शकता किंवा महामार्गावरूनही पुढे उपरस्ता घेत इथं येऊ शकता. एसटी किंवा खासगी बसनंही महाबळेश्वरपर्यंत येत पुढं लहान वाहनांनी तापोळा गाठता येतो.
तापोळ्यामध्ये प्रवेश करण्यासाठी कोणतंही शुल्क नसलं तरीही नौकाविहारासाठी तुम्हाला माणसी 750 रुपये, स्पीडबोटसाठी 1400 रुपये इतके पैसे भरावे लागतात. गेल्या काही वर्षांमध्ये तापोळाही पर्यटकांच्या आवडीच्या ठिकाणांपैकी एक ठरला असून, इथं येणाऱ्यांचा आकडा आता वाढत आहे. पण, येथील शांततेत मात्र अजिबात कमतरता नाही. तापोळ्यामध्ये राहण्यासोबतच खाण्यापिण्यासाठीचे उत्तमोत्तम पर्याय तुमच्यासाठी सज्ज आहेत. शिवाय इथं निसर्गाशी एकरुप होऊन सुट्टीचा आनंद देणाऱ्या अनेक संधी तुमची वाट पाहत आहेत. थोडक्यात काय? तर एकदा का तापोळ्यात तुम्ही पाऊल ठेवलं तर, खरंखुरं काश्मीरही विसराल इतकी ही भूमी कमाल आहे. काय मग? तुम्ही कधी येताय महाराष्ट्रातलं हे मिनी काश्मीर पाहायला?