दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : महाराष्ट्रातल्या लॉकडाऊनमध्ये आणखी शिथिलता आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. असं असलं तरी राज्यातला लॉकडाऊन ३१ जुलैनंतरही वाढवण्यात येणार आहे. राज्यात ५ ऑगस्टपासून मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स सुरू होणार आहेत. सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत मॉल्स सुरू राहणार आहेत. राज्य सरकारने याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
राज्यातील मॉल्स सुरु करण्यात येणार असले, तरी मॉल्समधील थिएटर आणि फूड मॉल तसंच हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स बंदच राहणार आहेत. मॉल्समधील रेस्टॉरंट आणि फूड कोर्टाचे किचन पार्सल देण्यासाठी खुले ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
या नव्या शिथिलतेसोबतच मागच्यावेळच्या शिथिलतेचे नियमही कायम राहणार आहेत. सरकारी आणि खासगी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती जुन्या नियमांप्रमाणेच ठेवावी लागणार आहे.
प्रवासासाठीही ५ ऑगस्टपासून लॉकडाऊनमध्ये मोठी शिथिलता देण्यात आली आहे. दुचाकीवर आतापर्यंत एकालाच परवानगी होती, आता दोन जण प्रवास करू शकणार आहेत. चार चाकीमध्ये १ +२ ऐवजी १+३ परवानगी असेल, रिक्षात १+१ ऐवजी १ २ परवानगी असेल टॅक्सीमध्ये १+२ ऐवजी १+३ अशी वाहतुकीस परवानगी असेल.
याशिवाय खुल्या मैदानातील खेळ जसे गोल्फ, आऊटडोअर फायरिंग, खुल्या मैदानातील जिम्नॅस्टिक, टेनिस, खुल्या जागेतील बॅडमिंटन याला ५ ऑगस्टपासून परवानगी देण्यात आली आहे.
केंद्र सरकारने ५ ऑगस्टपासून जिम उघडण्यास परवानगी दिली आहे, पण राज्यामध्ये मात्र जिमवर अजूनही बंदी कायम आहे. तसंच केंद्राने रात्रीची संचारबंदी उठवली असली, तरी राज्याने मात्र याबाबत काहीही निर्णय घेतलेला नाही. महाराष्ट्रामध्ये १५ मार्चपासून मॉल्स, शाळा, कॉलेज आणि जिम बंद करण्यात आल्या होत्या.