अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी पुण्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पुण्यातली कोरोना परिस्थिती, त्यावरून रंगलेलं राजकारण, भाजपने यासंदर्भात केलेले आरोप, हे सगळं पाहता मुख्यमंत्र्यांचा हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्याकडे दुर्लक्ष करुन अजित पवार पुण्यात कसे अपयशी ठरले, असं दाखवण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना? मुंबई नियंत्रणात आणली, पण अजितदादांना पुणे नियंत्रणात आणता आलं नाही, हे दाखवण्याचा प्रयत्न होत नाही ना? असे आरोप चंद्रकांत पाटील यांनी केले.
चंद्रकांत पाटील यांच्या या आरोपांनंतर मुख्यमंत्र्यांचा पुणे दौरा ठरला. अर्थात तो आधीपासून ठरला असेल कदाचित. मुख्यमंत्री गुरुवारी सकाळी ११ ते ५ असा पुण्याच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारही त्यांच्याबरोबर असतील.
पुण्यात १५ ऑगस्टपर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा १ लाखांवर जाण्याची शक्यता आहे. पुढच्या २ आठवड्यात किमान २ हजार आयसीयू आणि १ हजार व्हॅन्टिलेटरची आवश्यकता भासणार आहे.
मुख्यमंत्री केवळ मुंबईतील परिस्थिती कशी नियंत्रणात आणली, याबाबत पाठ थोपटवून घेत आहेत, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. इतकच नाही, तर पुण्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले हे दाखवण्याचा तर मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न नाही ना? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पुण्यात येऊन काय निर्णय घेतात? आणि यातून काय संदेश देतात? याबद्दल कमालीची उत्सुकता आहे.